अमरावती: मंदिरातील गाभाऱ्यातील दानपेटी फोडणाऱ्या चोरांच्या त्रिकुटाला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. रोहीत अरविंद मनवर (१९ वर्ष, रा. बेनोडा, गल्ली नं. २, अमरावती), आदित्य प्रभाकर काळे (२०, रा. हिंगासपुरे नगर, अमरावती) व सचिन वासुदेव दांडगे (२०,रा. बग्गी जावरा, ता. चांदुर रेल्वे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
चांदुर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनगाव जवळील साई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी सह रोख रक्कम चोरीला गेली होती. १४ ऑगस्ट रोजी त्याप्रकरणी चांदुर रेल्वे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु असतांना तो गुन्हा बग्गी जावरा येथील सचिन दांडगे याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती समोर आली. त्याआधारे सचिन दांडगे याला त्याच्या गावातून ताब्यात घेऊन त्याला मंदिर चोरीच्या गुन्हयासंबंधाने विचारपूस करण्यात आली. तपासादरम्यान ती चोरी आपण रोहीत मनवर व आदित्य काळे यांच्यासह केल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार रोहित व आदित्या यांना अमरावती येथील त्यांच्या घरून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीतील दानपेटी व १५०० रुपये नगदी तसेच गुन्हयात वापरलेली मोपेड असा एकुण ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कुऱ्हा येथील गुन्ह्याची कबुलीअटक तीनही आरोपींनी हनुमान मंदीर कुऱ्हा येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे तो गुन्हा देखील उघड झाला. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोउपनि मोहम्मद तस्लीम, मुलचंद भांबुरकर, अंमलदार मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे यांनी ही कारवाई केली.