चांदूरबाजार : तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या १६ तासांच्या भारनियमनाला कंटाळून अखेर खरवाडी रस्त्यावर मंगळवारी सकाळी चक्काजाम आंदोलन केले.स्थानिक वीज कंपनीच्या हद्दीत येणार्या कुरळपुर्णा, तळवेल, बेलोरा या फिडरवरील सिंगल फेजचा विद्युत पुरवठा असलेल्या गावांमध्ये भारनियमनाचे प्रमाण मार्यादेपेक्षा वाढले आहे. याबाबत गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या. परंतु तक्रारीचा वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चक्काजाम आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहीला नव्हता.भारनियमनाविरोधात नागरिकांमध्ये वीज कंपनी विरोधात रोष खदखदत होता. लोडशेडिंगमुळे गावातील लघुउद्योग संकटात आले होते. विद्यार्थ्यांनाही अभ्यास करतांना त्रास सहन करावा लागत होता. सततचे भारनियमन बंद करुन गावठाण फीडरची सुविधा करण्याबाबतही नागरिकांनी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराला वीज कंपनीने नेहमीच केराची टोपली दाखविली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन चक्काजाम आंदोलनाचा पवित्रा घेतला. नियमानुसार सिंगल फेज फिडरमध्ये गावातील विद्युत पुरवठा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. परंतु या सिंगल फेजच्या नावावर ग्रामीण भागात १६ तासांचे भारनियमन होत आहे. अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरेखा ठाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज चक्काजाम आंदोलन केले. दरम्यान, मुख्य अभियंता संजय ताकसांडे यांच्याशी आंदोलनकर्त्यांच्या चर्चेनुसार मनमानीपणे वीज ग्राहकांना देण्यात आलेली वीज देयके त्वरित दुरुस्त करण्यासंदर्भात विशेष शिबिर घेऊन याबाबत कारवाई केली जाईल. जिल्ह्याला सोफीया वीज प्रकल्पातून मोफत वीज पुरवठा देण्यात यावा यावर चर्चा करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत १0 जूनपर्यंंत निर्णय न झाल्यास कुठलीही वीज देयके नागरिक भरणार नाही असा इशारा यावेळी सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वातून शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडुपंत ठाकरे, प्रवीण भुजाडे, निखील ठाकरे, अनिस अहमद, दिलीप अंभोरे, दिलीप मेश्राम, संजय बावनथडे, बाळासाहेब विधळे, राजेश अढाव, रवींद्र काळे आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)
भारनियमनाविरोधात खरवाडी येथे चक्काजाम
By admin | Published: June 03, 2014 11:45 PM