चांदूर रेल्वे (अमरावती) : मोबाईलवर अश्लील फोटो पाठवून व पाठलाग करून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी मध्य प्रदेश व अकोला जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक केली आहे. विजय मोहन डाबेराव (२१), रंजित रणसिंह पवार (१९, दोघेही रा. टाकळी पोटे, जि. अकोला) व १९ वर्षीय महिला (रा. नवेगाव, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
एका १५ वर्षीय पीडिताला ओळखीचे दोन इसम व एक महिला यांनी वारंवार फोन करून तिला फोनवर बोलण्यास बाध्य करीत होते. परंतु, फिर्यादीने नकार दिला. सदर आरोपींनी पीडिताच्या एका मैत्रिणीला फोन करून तिला बोलण्यास सांगितले. नाही बोलली, तर जिवाने मारून टाकू, अशी धमकी दिली. पीडिताच्या व्हॉट्सअॅपवर एका आरोपी महिलेने तिचे अश्लील छायाचित्र पाठवून लज्जास्पद वाटेल असे कृत्य केले. याशिवाय आरोपींनी पीडिताच्या गावात जाऊन सतत पाठलाग केला व तिला फोन केले. अशा तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३५४ ड, ५०६, ३४, सहकलम ११, पोक्सो सहकलम ६७, ६७ अ, माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून घेतला.
चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते यांनी उपनिरीक्षक गणेश मुपडे, कर्मचारी गजानन ठाकरे, महेश प्रसाद व महिला पोलीस प्रिया हिरेखन यांच्या पथकाला आरोपींच्या शोधात रवाना केले. या पथकाने प्रथम अकोला जिल्ह्यातील टाकळी पोटे येथून आरोपी विजय डाबेराव व रंजित रणसिंह पवार यांना अटक केली. यानंतर मध्य प्रदेशमधील नवेगाव येथून १९ वर्षीय महिला आरोपीला अटक केली.
-------