अमरावती : एकतर्फी प्रेमातून सडकसख्याहरी काय करतील, ते सांगता येत नाही. प्रेमाला नकार दिला की ते हिंसक बनतात. अशीच एक घटना स्थानिक सामरानगर येथे ८ मार्च रोजी दुपारी उघड झाली. एक सडकसख्याहरी झिंगलेल्या स्थितित एका मुलीच्या घरात शिरला. मला पैसे लागतील, अन्यथा बघ. तुला व तुझ्या आईवडिलांना सोडणार नाही, अशी धमकी तिला दिली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपी दद्या उर्फ विक्की पाटील (२५, रा. किरणनगर) याच्याविरूध्द धमकी, शिविगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, आरोपी दद्या हा नेहमीच तक्रारकत्या महाविद्यालयीन तरूणीचा पाठलाग करत असतो. दोन महिन्यांपुर्वी आरोपी पाठलाग करत तिच्या कॉलेजपर्यंत देखील पोहोचला होता. दरम्यान, ७ मार्च रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास ती तरूणी फरशी स्टाॅपकडून मोतीनगरकडे मोपेडने जात होती. ती मोतीनगर रस्त्यावर असताना दद्या उर्फ विक्की पाटील हा अचानक पाठलाग करत तिच्याजवळ पोहोचला. तिला शिविगाळ केली. तथा तुला सोडणार नाही, अशी धमकी देखील दिली.
दुसऱ्या दिवशी घरात शिरला
८ मार्च रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास ती तरूणी तिच्या घरात हॉलमध्ये एकटीच बसली असताना आरोपी दद्या हा अचानक त्या हॉलमध्ये शिरला. त्यावेळी तो मद्यधुंद स्थितीत होता. तो तिच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे ती ओरडली. त्यावेळी त्याने चाकुचा धाक दाखवत मला पैसे लागतील, नाहीतर मी तुझ्यासह तुझ्या आईवडिलांना सोडणार नाही, तू विचार कर, मी पुन्हा पुन्हा येईन, असे दरडावत तो बाहेर निघून गेला. आईवडील घरी परतल्यानंतर तिने तो प्रसंग त्यांना सांगितला. तथा ८ मार्च रोजी उशिरा रात्री राजापेठ पोलीस ठाणे गाठले. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली.