अमरावती : एका १७ वर्षीय मुलीला इन्स्टावरील चॅटिंग चांगलीच महागात पडली. ओळख व चॅटिंगआड चक्क तिघांनी तिला शरीरसुखाची मागणी केली, अन्यथा तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अलीकडे त्यांनी तिचा पाठलाग चालविला, घरदेखील गाठले. त्यामुळे तिने पोलिस ठाणे गाठले. अखेर याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी तिघांविरुद्ध विनयभंग व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपींमध्ये मनीष रामेश्वर गायकवाड (२३), विशाल सुधीर बोंडे (३६) व देवानंद गजानन तेल्हारे (४३, तिघेही रा. अडुळाबाजार) यांचा समावेश आहे. यातील अल्पवयीन मुलगी सन २०२० मध्ये कोरोना असल्याने दर्यापूर येथील रूम सोडून स्वगावी परतली होती. त्यावेळी ती आरोपी मनीष गायकवाड याच्याशी फोन तसेच इन्स्टाग्रॉमवर बोलत होती. त्याचदरम्यान ती ट्यूशनसाठी देवानंद तेल्हारे याच्या ऑटोतून ये-जा करीत होती. त्यानंतर काही दिवसांनी मनीष गायकवाड याने तिचा पाठलाग सुरू केला. शारीरिक सुखाची मागणीदेखील केली. त्याला नकार दिला असता, तुझे फोटो माझ्याकडे आहेत, ते व्हायरल करतो, अशी धमकी तो तिला देऊ लागला.
बहिणीचे आयुष्य खराब करण्याची धमकी
मनीषने या सर्व बाबी आरोपी विशाल व देवानंदला सांगितल्या. त्यामुळे तेदेखील तिचा पाठलाग करून मानसिक त्रास देत होते. डिसेंबर २०२२ पासून तीनही आरोपींनी फिर्यादीला मारण्याची, तिच्या लहान बहिणीचे आयुष्य खराब करण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने दोन वर्षांपासून त्याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.
गावात शिरून धमकी
१७ वर्षीय पीडिता ही दिवाळीनिमित्त तिच्या गावी आली असता, यंदाच्या ८ नोव्हेंबर रोजी तीनही आरोपी तिच्या गावात गेले. तिच्या घराजवळ जाऊन त्यांनी तू आम्हाला शरीरसुख दे, नाही तर अश्लील फोटो व्हायरल करतो, अशी धमकी दिली. फिर्यादी मुलीची गावामध्ये बदनामी देखील केली. २० नोव्हेंबरपर्यंत आरोपींचा पाठलाग सुरूच राहिला. त्यामुळे तिने तो सर्व प्रकार कुटुंबीयांच्या कानावर घातला तथा २४ नोव्हेंबर रोजी दर्यापूर पोलिस ठाणे गाठले.