यूजीसी नियमावलीनुसार नॅकसंबंधी प्रशासकीय किंवा इतर कामात कुठेही तासिका प्राध्यापकांचा संबंध येत नाही. असे असताना समाजशास्त्र विभागप्रमुख के.बी. नायक यांनी आपल्या कामाची जबाबदारी तासिका प्राध्यापक यांना वेठीस धरून त्यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्यामुळे विभागाच्या नॅकच्या गुणात्मक व दर्जात्मक कामांचा आता प्रश्न निर्माण झाला आहे.
के.बी. नायक यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तासिका प्राध्यापक यांची ऑनलाईन बैठक घेऊन प्रत्येकाचे नॅकसंबंधी कामांचे दिवस वाटप करून विभागात दिलेल्या दिवशी हजर राहण्याचे मौखिक आदेश निर्गमित केले. विभागप्रमुख के.बी. नायक यांनी तासिका प्राध्यापक मंगेश ठाकरे यांच्या कार्यमुक्त प्रकरणात नॅकच्या दृष्टीने विभागासाठी कोण योग्य, कोण अयोग्य, याची लेखी तक्रार सादर करुन नॅकची कामे तासिका प्राध्यापकांकडून करवून घेत असल्याबाबत दुजोरा दिला आहे. विभागप्रमुखांचे आदेश न पाळल्यास नोकरी जाऊ शकते, या भीतीपोटी या महिन्यात काही प्राध्यापकांनी लॉकडाऊन असूनसुद्धा विभागात नॅकच्या कामासाठी उपस्थिती लावली आहे.
कोरोनाकाळात विभागप्रमुख यांच्याद्वारे होत असलेल्या पिळवणुकीबद्दल तासिका प्राध्यापकांत रोष निर्माण होत असून, नेट, सेट, पीएच.डी., सीएचबी कृती समितीतर्फे विभागप्रमुखाच्या निलंबनाची मागणी होत आहे. याबाबत के.बी. नायक यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.
-------------------
समाजशास्त्र विभागप्रमुखाच्या कारभाराविषयी कुलगुरूंकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी चौकशीदेखील सुरू आहे. प्रशासनाने खुलासा मागविला आहे. ‘नॅक’ मू्ल्यांकनाच्या कामात सीएचबी प्राध्यापकांवर जबाबदार सोपविता येत नाही.
- मंगेश ठाकरे, अध्यक्ष, पीएच.डी., सीएचबी कृती समिती.