अमरावती : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर बेहिशेबी मालमत्तांच्या आरोपानंतर आता अमरावती येथील लाचुलचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) त्यांची उघड चौकशी सुरू केली आहे. आमदार देशमुख यांच्यासह त्यांचे रक्तसंबंधी नातेवाईक यांच्या नावे असलेेल्या प्लॉट, शेती, जमीन आदी स्थावर मालमत्तेची कागदपत्रे प्रमाणित सत्यप्रत पाठविण्याबाबतचे पत्र एसीबीने पातूर तहसीलदारांना दिले आहे.
एसीबीने उघड चौकशी क्रमांक ईओ/४६/ अकोला २०२२ नुसार आमदार नितीन देशमुख यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू केली आहे. आमदार देशमुख यांना १७ जानेवारी रोजी एसीबीच्या अमरावतीच्या विभागीय कार्यालयात बयाण नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले होते. आता एसीबी देशमुखांच्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचा शोध घेत त्याची कागदपत्रे अमरावतीला सादर करण्यासंदर्भात एसीबीने अकोला जिल्ह्यातील पातूरच्या तहसीलदारांना पत्र लिहिले आहे.
आमदार नितीन देशमुख यांचे मूळ गाव सस्ती हे असून, ते पातूर तालुक्यातील आहे. अमरावतीच्या विभागीय कार्यालयाने पातूरच्या तहसीलदारांना संपत्तीच्या व्यवहारांच्या खरेदी-विक्रीची माहिती मागितली आहे. आमदार नितीन देशमुख यांचे भाऊ, बहिण, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने संपत्ती घेतली असल्यास ते शोधण्याचे दिले आदेश पातूर तहसीलदारांना देण्यात आले आहे. त्यामुळे पातूर तहसीलदारांना आमदार देशमुखांसह नातेवाईकांच्या स्थावर मालमत्तेची उघड चौकशी करावी लागणार आहे.
अमरावती एसीबीने पातूर तहसीलदारांमार्फत नातेवाईकांच्या स्थावर मालमत्तेबाबत माहिती मागविली आहे. निश्चित चौकशी व्हावी. तहसीलदार यासंदर्भात चौकशी करतील. माझ्याकडे मुंबईत बंगला आहे, असे म्हणने आहे. मी तर म्हणतो, एसीबीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना माझ्या संपत्तीबाबत चौकशीचे तपास करण्याचे आदेश द्यावे.
- नितीन देशमुख, आमदार, बाळापूर