अमरावती : गर्दीमुळे होणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शेतकरी गटांना आता बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा केला जाणार आहे. तसा आदेश जिल्हधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी जारी केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके, या कृषी निविष्ठांची संनियंत्रण समिती संरक्षित साठा व जैवतंत्रज्ञान जिल्हा समित्यांची सभा आयोजित केली होती. यात जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला निर्देशित केले. शेतकरी समूहाने किंवा गटाद्वारा रासायनिक खतांची खरेदी करण्यात यावी. ही खते कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोच करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी निविष्ठा संघ व कृषी विभागाला केल्या.
यासाठी गटातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे आधारकार्ड गटप्रमुखाजवळ द्यावे व गटप्रमुखाने कृषी सेवा केंद्रात जाऊन आधारकार्डचा वापर करून खतांची खरेदी करावी. खरेदी करताना पॉस मशीनवर अधार क्रमांक टाकल्यानंतर गटातील इतर शेतकऱ्यांना आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी शेतकऱ्यांनी गटप्रमुखास दिल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या नावाने स्वतंत्र पावत्या मिळणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
बॉक्स
एचटीबीटीची प्रलोभन दाखवून विक्रीची शक्यता
बिजी-३ ची बियाणे ग्लायसेल बीटी, आरआर बिटी, एचटीबीटी आदी वेगवेगळ्या नावाने विक्री होण्याची शक्यता आहे. याशिवाय एजंटाद्वारा प्रलोभणे दाखवूनही विक्री केली जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, अशाप्रकारची कोणत्याही गावात विक्री होत असल्यास जवळच्या कृषी कार्यालयास माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.