अमरावती : केम प्रकल्पाच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तत्कालीन प्रकल्प उपसंचालक अजय भास्कर कुळकर्णी (६० रा. पुणे) याने ११ फेब्रुवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले.
पोलिसांनी अजय कुळकर्णीला अटक करून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी आरोपी अजय कुळकर्णीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे.
अटकपूर्व जामीन नाकारल्याने आत्मसर्मणकेम प्रकल्पाच्या गैरव्यवहारप्रकरणी प्रथम पोलिसांनी तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी अन्य आरोपींचे अटकसत्र सुरू केले होते. दरम्यान प्रकल्प उपसंचालक अजय कुळकर्णी यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला. तो न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला. परंतु, तेथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले.
असे आहे प्रकरण?
मुंबई येथील कोकण विभागात उपायुक्त पदावर कार्यरत असणारे गणेश चौधरी यांनी केम प्रकल्पाच्या संचालक पदावर असताना ६ कोटी १२ लाख ३९ हजार ९३५ रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी त्यांच्याविरुध्द भादंविच्या कलम ४०९ व ४२० अन्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे.