लोकमत इम्पॅक्ट
वनविभागाचे फलक लागले, वनकायद्याने होणार कारवाई
परतवाडा (अमरावती) : मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या चिचाटी, कलालकुंड व बकादरी येथील धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शनिवारी तसे फलक वनविभागाने लावले आहे.
दोन्ही धबधब्याच्या डोहात अमरावती आणि रिद्धपूर येथील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. ‘लोकमत’ने हुल्लडबाज पर्यटकांचे यासंदर्भात वृत्त शनिवारी वृत्त प्रकाशित केले होते.
मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा अंतर्गत घटांग वनपरिक्षेत्रात चिचाटी, कलालकुंड व बकादरी या तीन उंचावरून कोसळणारा धबधब्यांचा समावेश आहे. ४ जून रोजी कलालकुंड येथील डोहात अंकित गजभिये (रा. रिद्धपूर) येथील या युवकाचा मृतदेह डोहात आढळून आला होता. काही मित्रांसह तो फिरायला आला होता. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दुसरी घटना चिचाटी येथे १३ जुलै घडली. अमरावती येथील श्रीनिधी सकाळकळे हा इयत्ता बारावीतील विद्यार्थी कोचिंग क्लाससमवेत सहलीला आला होता. डोहात बुडून तो मरण पावला. या दोन्ही घटनांचा तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत.
-----------------
गुन्हा व पाच हजार रुपये दंड
चिचाटी, कलालकुंड, बकादरी आदी ठिकाणी दारूड्या, हुल्लडबाज मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी करीत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. दुसरीकडे कोरोना नियम पाहता, पर्यटन स्थळावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नियमबाह्य प्रवेश करणाऱ्यांना भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) डी नुसार राखीव वनात प्रवेशप्रकरणी पाच हजार रुपये दंड व एक वर्ष कारावासाची शिक्षा आहे. याबाबत फलक वनविभागाने शनिवारी लावले.
बॉक्स
फलक वाचून अनेक परतले
शनिवारी धामणगाव गढी आणि चिखलदरा नाक्यावरून अनेक पर्यटकांना परत करण्यात आले. त्यामुळे जोर मार्गाचा वापर करून चिकाटी व कलालकुंड पर्यटक गेले होते. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फलक वाचायला लावले तेव्हा अनेकांनी तिथून परत जाणे पसंत केले असल्याची माहिती वनपाल अभिमान गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिली