श्यामकांत पाण्डेय - धारणीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेळघाटच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी चौराकुंड हे गाव निवडण्यात आले आहे. या गावाची अवस्था पाहण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली असता तेथे अत्यंत विदारक परिस्थिती पहावयास मिळाली. हे गाव हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव परिक्षेत्रात येते. या गावाची अवस्था सध्या पाणी व विजेअभावी अत्यंत वाईट झाली आहे. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना विशेषत: महिलांना एक किलोमीटरची पायपीट करावी लागते. डोक्यावर तीन ते चार भांड्यांचा थर ठेवून त्यांना पाणी भरावे लागते. सकाळी व सायंकाळी या परिसरात हीच स्थिती पाहायला मिळत आहे. गावात पाणीपुरवठ्याचे मोठे टाके आहे. परंतु तीन वर्षांतून फक्त ३० दिवस या नळाला पाणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. परिसरातील नळ योजना नेहमी वीज व नियोजनाअभावी सतत बंद राहते. ग्रामसेवक गावाला अमावस्या-पौर्णिमेलाच दर्शन देतात. ते हरिसाल येथे बसूनच या गावाचा कारभार चालवितात. गावातील लोकांना ग्रामसेवक, तलाठी व वायरमॅनचे नावही माहीत नाही. ते गावात कधी येतात व कधी जातात याचा सुुगावाही लोकांना लागत नाही. गावात स्वस्त धान्य दुकानातून अनियमित धान्य पुरवठा होते. मालाचे परमीट दिले आहे. पण द्वारपोच योजनेमार्फत धान्य न आल्याचे उत्तर गावकऱ्यांना दिले जाते. गावात प्रवेश करताच पूर्वेकडे वनविभागाचे विश्रामगृह व चौराकुंड व्याघ्र परिक्षेत्राचे कार्यालय आहे. या कार्यालयाशी चौराकुंडवासीयांना काहीही देणे-घेणे नाही. कारण, चौराकुंड हे गाव हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या परिक्षेत्रात येते. हरिसाल येथे आरएफओ नसल्याने सध्या आरओ येथील कार्यभार सांभाळत आहे. ते सध्या नवीन आहेत. गावातील तलाठी निलंबित झाला आहे. तलाठ्याचे मुख्यालय हरिसाल असल्याने लोकांनी त्याला कधीही गावात पाहिले नाही. त्याचे नावही लोकांना माहीत नाही. गावात पशुचिकित्सालय आहे. मात्र, डॉक्टरांना कोणीही ओळखत नाही. हे महाशय आठवड्यातून एक दिवस गावात येतात. उर्वरित दिवस ते हरिसालमध्ये बसून नोकरीचे सोपस्कार पार पाडतात. मुख्यमंत्र्यांचा दौरा लागल्याने पशु चिकित्सालयात उगवलेला काडीकचरा वेचण्यासाठी एका व्यक्तिची नियुक्ती केली आहे. तो कुटुंबासह सफाई करीत आहे. नकळत या कामात बालमजुराचा वापर सुरू आहे. गावात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जि.प. माध्यमिक शाळा आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाचे कार्यालय नादुरूस्त झाले आहे. ते कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसाधनगृहांचीही तीच अवस्था आहे. येथील पाण्याच्या टाकीत एक थेंबही पाणी नाही. गावातच पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना शाळेत पाणी येणार कोठून, असा सवाल उपस्थित होत आहे. शिक्षकांसाठी निवासाची व्यवस्था नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक हरिसालहून ये-जा करतात. चौराकुंड हे पूर्णपणे समस्यांचे माहेरघर बनले आहे. याची दशा व दिशा बदलण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. मात्र, येथील अधिकारी येथे सर्वच ‘आॅलवेल’ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट गावकऱ्यांसोबतच संपर्क साधायला हवा.
चौराकुंडचे हाल बघावेत मुख्यमंत्र्यांनी!
By admin | Published: November 24, 2014 10:50 PM