--------------------------
बच्चू कडू, कामगारांवर उपासमारीची वेळ
परतवाडा : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर येथील फिनले मिल कामगारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. याद्वारे त्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून, याबाबत सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न व पाठपुरावा होत असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या अखत्यारीतील फिनले मिल काही महिन्यांपासून बंद आहे. येथील कामगार कामाअभावी आर्थिक विवंचनेत आहेत. मिल बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची मागणी राज्यमंत्री कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी तत्काळ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत मिल तातडीने सुरू करण्यासंबंधी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याबाबत कळविले. या कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गोयल यांनी सांगितले.