हद्दपारची मागणी : कायदा, सुवस्यस्थेचा वाचला पाढा अमरावती : वडाळी येथील वादग्रस्त देशी दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी महिला शक्तींनी थेट हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेला. हे दुकान हद्दपार करण्यात आले नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, हे देखील महिलांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आता याबाबत कोणतीही निवडणूक अथवा मतदान नकोच, अन्यथा रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ, असा निर्वाणीचा इशारा महिलांनी दिला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, शनिवारी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असता येथील शासकीय विश्राम भवनात वडाळीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देशी दारु विक्री दुकानाबाबतची कैफियत विशद केली. हे देशी दारु विक्रीचे दुकान मुख्य रस्त्यावर असून अतिशय त्रासदायक ठरत आहे. हे दुकान वडाळीतून कायम हद्दपार करण्यात यावे, यासाठी महिलांच्या मागणीनुसार यापूर्वी मतदान घेण्यात आले. मात्र महापालिका प्रशासनाला देशी दारु विक्रेत्याने हाताशी धरुन मतदार यादीत घोळ केला. १६ फेबु्रवारी २०१४ रोजी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. त्यामुळे अनेक महिलांना मतदारापासून वंचित राहण्याचा प्रसंग ओढावला. मतदार यादीत झालेल्या घोळामुळे ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तेंव्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप करुन पुढील निर्णयापर्यंत हे दारु विक्रीचे दुकान बंद करण्याचे आदेश दिले. मात्र दारु विक्रेत्याच्या मागणीनुसार याप्रकरणी पुन्हा मतदान घेण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने चालविल्याचे दिसून येते. मात्र हे देशी दारु विक्रीचे दुकान वडाळीत नकोच, अशी आग्रही मागणी या परिसरातील महिलांची असताना ते हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.मागील १० महिन्यांपासून अस्थायी स्वरुपात हे दुकान बंद असून येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायचा असेल तर हे दुकान हद्दपार करुन महिलांचे सौभाग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. वडाळीत या देशी दारुच्या दुकानामुळे सतत वाद, तंटे, शिवीगाळ, हाणामारी नित्यनेमाने घडतात. सुमारे २० ते २२ हजार लोकवस्ती असलेल्या वडाळी परिसरात कष्टकरी, गरीब, सामान्यांचे वास्तव्य आहे. येणारी पिढी नेस्तनाबूत होऊ नये, यासाठी हे देशी दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करुन या भागात शांतता कायम ठेवण्यासाठी योग्य निर्णय घ्ेऊन न्याय प्रदान करावे, अशी मागणी करण्यात आली.निवेदन सादर करताना निशा चव्हाण, अनिता वानखडे, फरजाबी सैय्यद अख्तर, जिजाबाई गोझणे, हर्षा राऊत, पुष्पा गुहे, ललिता आंबेकर, कल्पना वैद्य, रोहिनी गाडरे, कविता गंडेवार, प्रणिता दिवे, शोभा खुळे आदी उपस्थित होते.
देशी दारु दुकानाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांचा दरबारात
By admin | Published: November 29, 2014 11:14 PM