अमरावतीहून तीन तासांत गाठले दर्यापूर, मंगळवारी ‘नॉन मोटर व्हेईकल’ अभियान
सचिन मानकर - दर्यापूर : महापलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या धर्तीवर दर्यापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी सोमवारी सायकलनेच कार्यालय गाठले. तत्पूर्वी, रविवारी त्यांनी अमरावती येथील निवासस्थानाहून ४६ किमी अंतर सायकल चालवित दर्यापूर गाठले. वंजारी या तीन तास सायकल चालवून दर्यापुरात पोहोचल्या. आता दर मंगळवारी ‘नॉन मोटर व्हेईकल’ अभियान जाहीर करण्यात आले आहे.
राज्य शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शहरी भागातील वायुप्रदूषण रोखण्यासाठी सायकल वापरण्यास प्रोत्साहन देणे व त्याची व्यापक जनजागृती करणे हेसुद्धा मूल्यांकनात अंतर्भूत आहे. त्याअनुषंगाने दर्यापूर शहरात ‘नॉन मोटर व्हेईकल’ला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी स्वत: सायकल चालविण्याचे ठरविले. १३ डिसेंबर रोजी अमरावती- भातकुली- जसापुर- दर्यापूर असा प्रवास त्यांनी सायकलने पूर्ण केला. सोमवारपासुन त्यांनी आपल्या कार्यालयातसुद्धा सायकलनेच येण्याचे ठरविले आहे. नगरपालिकेत, शहरात विविध कामांसाठी शक्य होईल तेव्हा सायकलनेच जाण्याचे त्यांनी ठरविले आहे. शहरातील नागरिकांना सायकल वापरायला सांगायचे, तर आधी आपणच ती सवय अंगीकारली पाहिजे, या भावनेने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
कोट:
सायकल चालविण्याविषयी लोकांच्या मनात काही शंका असतात. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या शहराचा विस्तार अडीच किमीपेक्षा अधिक नसल्याने सायकल वापरणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त पायी चालणे, सायकल चालवावी.
गीता वंजारी, मुख्याधिकारी, दर्यापूर