चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील लाँग पॉइंटवर एका १५ फूट लांबीच्या अजगराने हरणाची शिकार केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी १२.३० वाजता परिसरातील नागरिकांना दिसला. यानंतर तेथे बघ्यांची गर्दी उसळली. पूर्व मेळघाट वनविभागाच्या चिखलदरा परिक्षेत्रांतर्गत अप्पर प्लेटो परिसर आहे. येथील लाँग पॉइंट नजीकच्या दरीत अंदाजे १५ फुटांच्या अजगराने हरणाची शिकार केली. वैराट गावाचे पुनर्वसन झाल्यावर परिसरात मोठ्या प्रमाणात कुरणाचा विस्तार करण्यात आला आहे. येथील सिपना महाविद्यालयाचे प्राध्यापक गजानन मुरतकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. कुरणामुळे वैराट परिसरात हरिण, सांबराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.बघ्यांची गर्दीलाँग पॉइंट परिसरात अजगराने हरीण गिळल्याचे वृत्त पसरताच पांढरी व रेंजर कॉलेज परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. काही बक-या व गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांनी आपल्या शेळ्या मोजून घेतल्या. दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अजगर एकाच ठिकाणी पडून होता. लाँग पॉइंट येथील घटनेविषयी संबंधित वनपालास माहिती घेण्याचे सांगण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.के.मुनेश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
चिखलद-यात अजगराने केली हरणाची शिकार, बघ्यांची उसळली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 7:20 PM