नरेंद्र जावरे
अमरावती : सात जन्माच्या गाठी बांधण्यासाठी एकत्र आलेल्या नवजोडप्यांचे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळ ही प्री-वेडिंग शूटिंगसाठी पहिली पसंत ठरले आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळपासून नागपूरसह भुसावळ, नांदेड तसेच महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्ह्यांमधील परिणयबंधात बांधल्या जाणाऱ्यांची आवड चिखलदरा ठरले असून फोटोशुटसाठी पहिली पसंतीही विदर्भाचे हे काश्मीरच ठरले आहे.
आयुष्यातील महत्त्वाच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद व्हाव्यात, यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधन यंत्रसामग्रीचा वापर आज होतो. नववधूची पसंती झाली की, पूर्वी थेट लग्नात भेटी व्हायच्या. आता काळ बदलला, गतिमान झाला. वैचारिक क्षमता वाढली. मुलगा - मुलीची पसंती होताच लग्नापूर्वी प्री-वेडिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
प्यार के इस खेल में...
प्री-वेडिंगच्या चित्रीकरणासाठी निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय स्थळ आवश्यक. मेळघाटातील सौंदर्याची खाण असलेले चिखलदरा, सेमाडोह, उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे भीम कुंड, जत्रा डोह, जवाहर कुंड, नौका विहार, देवी पॉईंट, गाविलगड, किल्ला या महत्त्वाच्या पॉईंट व डोंगरदऱ्यात प्री-वेडिंग शूटिंग केले जाते.
दाट धुके अन् जुलै ते मार्च गर्दी
प्री-वेडिंगसाठी चिखलदऱ्यात जुलै ते मार्चपर्यंत सर्वाधिक प्रमाणात चित्रीकरण केले जाते. दाट धुके ही पहिली पसंती. कोसळणारा पाऊस, हिरवीगार वनश्री, डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा पाहूनच चिखलदरा, सेमाडोह व परिसर पहिली पसंती ठरू लागला आहे.
वर्षाला दोन हजारांहून अधिक शूटिंग
वर्षाला चिखलदरा व संपूर्ण परिसरात दोन हजारांहून अधिक लग्नगाठीत बांधल्या जाणाऱ्या नवदाम्पत्याचे प्री-वेडिंग शूटिंग केले जाते. घरच्यांची परवानगी घेऊन हे सर्व चित्रीकरण घेतले जात असले तरी आवश्यक ठिकाणाची परवानगी व्याघ्र प्रकल्पातून घ्यावी लागते. विविध महागडे कॅमेरे लेन्स आणि ड्रोन कॅमेऱ्यातून प्री-वेडिंगचे चित्रीकरण केले जाते.