बक्षीस वितरण : जि.प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सवअमरावती : जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव स्थानिक श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ७ व ८ फेब्रुवारीला पार पडला. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण व समारोपीय सोहळा ८ फेब्रुवारीला सायंकाळी पार पडला. या खेळातून चिखलदरा पंचायत समितीने जनरल चॅम्पियनशिप पटकावली, तर सांस्कृतिक कार्यक्रमात वरूड पंचायत समिती अव्वल ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत आभाळे होते. बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, क्रांती काटोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, निरंतर शिक्षणाधिकारी प्रदीप अभ्यंकर, गटविकास अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, अरविंद गुडधे, पी.व्ही. सोळंके, क्रीडा संयोजक नितीन उंडे आदींची उपस्थिती होती. या क्रीडा महोत्सवात ४६ प्रकारचे खेळ खेळले गेले. स्विमिंगचा नवीन प्रकार प्रथमच घेण्यात आला. यावेळी अहवालवाचन नितीन उंडे यांनी, तर संचालन गजानन देशमुख यांनी केले. उपस्थितांचे आभार गंगाधर मोहने यांनी मानले. क्रीडा महोत्सवात सांघिक खेळामधून पुरूषांच्या कबड्डी सामन्यात चिखलदरा संघ विजयी, तर अमरावती मुख्यालय संघ उपविजेता ठरला. कबड्डी स्पर्धेत महिलांच्या सामन्यातही चिखलदरा संघ विजयी, तर नांदगाव खंडेश्वरचा संघ उपविजेता ठरला. खो-खो पुरूष सामन्यांमध्ये दर्यापूर विजयी, तर महिलांमध्ये चिखलदरा संघ विजेता ठरला. व्हॉलीबॉलमध्ये चिखलदरा संघ विजेता, तर धारणी संघ उपविजेता ठरला. फुटबॉल सामन्यामध्ये अमरावती मुख्यालयाचा संघ विजेता ठरला. इतरही स्पर्धांमध्ये अनेक संघांनी मोहोर उमटवली. बॅडमिंटन एकेरीचे महिला संघाचे विजेतेपद शीतल देशमुख यांनी, तर एकेरी पुरूषाचे विजेतेपद संजय अंभोरे यांनी पटकावले. बॅडमिंटन दुहेरी पुरूष संघामध्ये गोवर्धन बारगडे, संदीप जयस्वाल यांनी विजय मिळविला तर दुुहेरी महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत शीतल देशमुख, ज्योत्स्ना साबळे यांनी विजय पटकवला. (तालुका प्रतिनिधी)
चिखलदरा पं.स.ला जनरल चॅम्पियनशिप
By admin | Published: February 11, 2017 12:15 AM