नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : आठवड्याभरानंतर ढगाळ वातावरण हटल्याने रविवारपासून कडाक्याची थंडी पडू लागली आहे. तापमानात घट झाली असून, मंगळवारी पहाटे ५ वाजता विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळाचा पारा ६ अंश सेल्सिअसपर्यंत कोसळला होता. तर, ७ वाजता ८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. त्यामुळे संपूर्ण परिसर पूर्णतः गारठला होता.
आठवड्याभरानंतर थंडीने पुन्हा कमबॅक केले आहे. तापमान पाच ते सहा अंशांनी घटले आहे. फेंगल चक्रीवादळामुळे कडाक्याची थंडी पडत असताना अचानक थंडीमुळे गारठलेला परिसर सामान्य तापमानावर आला होता. शनिवार, रविवारपासून पुन्हा कडाक्याची थंडी पडू लागली आहे. दिवसरात्र गरम कपडे व शेकोटीजवळ बसून थंडीपासून मेळघाटातील आदिवासी बांधवांना स्वतःची संरक्षण करावे लागत असल्याचे चित्र आहे.
अचानक घटले तापमान जिल्ह्यात ढगाळ वातावरण दूर आल्यानंतर तीन दिवसांपासून तापमानात सतत घट येत असताना चिखलदरा पर्यटनस्थळावर मंगळवारी पहाटे ५ वाजता ६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले. मध्यरात्री २ ते पहाटे ४ या वेळेत ते ७ अंश सेल्सिअस होते, त्यानंतर पुन्हा ६ नंतर ७ अंश सेल्सिअस होते. सकाळी ७:३० वाजता ८ अंश सेल्सिअसची नोंद गुगलवरसुद्धा जाली आहे.
चिखलदऱ्यात तापमान नोंदीचे यंत्र नाही विदर्भाचे नंदनवनात विकासकामाचर कोट्यवधीचा खर्च होत आहे. पण, येथील एका खासगी महाविद्यालयातील जुन्या यंत्रावर तापमान नोंदीसाठी अवलंबून राहावे लागते, प्रशासकीय स्तरावर नगरपालिका, तहसील कार्यालय किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत या थंड हवेच्या ठिकाणी आधुनिक संगणकीय तापमान यंत्र बसविणे गरजेचे आहे.
थंडीत अनुभवण्यासाठी येतात पर्यटक चिखलदरा वेथील पर्यटनस्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह, कोलकास येथील जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कडाक्याच्या थंडीत वाढली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देणारे पर्यटक मुसळधार पावसात आणि थंडीत सारख्याच संख्येने येत असल्याचे चित्र आहे. त्याला कारणीभूत येथील शुद्ध, स्वच्छ पर्यावरण आहे.