पर्यटन संचालनालयाचे चिखलदऱ्याकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत यंदा राज्यातील २० ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. या पर्यटन महोत्सवाच्या यादीतून चिखलदऱ्याला मात्र वगळण्यात आले आहे.
चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन. मेळघाटच्या कुशीतील थंड हवेचे ठिकाण. समृद्ध वनस्पतींनी नटलेले आणि निसर्ग सौंदर्याने बहरलेले व कोरकू आदिवासी संस्कृतीचा वारसा लाभलेले विदर्भातील एकमेव ठिकाण. पर्यटन संचालनालयाने पर्यटन महोत्सवाच्या यादीतूनच चिखलदऱ्याला वगळल्यामुळे हा वारसा आणि सौंदर्य पाहण्याच्या संधीस पर्यटक मुकणार आहेत.
चिखलदरा येथे १९९२ पासून पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात २०, २१ व २२ नोव्हेंबर १९९२ रोजी चिखलदरा येथे पहिला पर्यटन महोत्सव घेतला गेला. याकरिता स्वत: सुधाकरराव नाईक चिखलदऱ्यात मुक्कामी होते. पर्यटन विभागाचा यात सक्रिय सहभाग राहिला. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने चिखलदरा पर्यटन संचालनालयाच्या नकाशावर आले. यानंतर तब्बल १४ वर्षांनी २५ ते २७ फेब्रुवारी २००६, २३ ते २५ डिसेंबर २००६ आणि २३ ते २५ डिसेंबर २००७ ला चिखलदरा पर्यटन महोत्सव पार पडला. पुढे तीन वर्षांच्या ब्रेकनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्याने २८ ते ३० जानेवारी २०११ दरम्यान चिखलदरा पर्यटन महोत्सव घेतला गेला. २०११ नंतर २०१५, २०१६ व २०१७ अशा लागोपाठ वर्षांत पर्यटन महोत्सव घेतला गेला. २०१८ आणि २०१९ मध्ये परत चिखलदरा पर्यटन महोत्सव घेतला गेला नाही.
दरम्यान, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पर्यटनाकडे लक्ष पुरविले. जिल्हाधिकाऱ्यांसह पर्यटन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेतल्या. संवाद साधला. यातून चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पर्यटन संचालनालयाकडूनच पर्यटन महोत्सवाच्या यादीतून चिखलदरा वगळले गेल्यामुळे परत एकदा पर्यटकांच्या पदरी निराशा आली आहे.