चिखलदरा : रोजगार हमी विभाग व मृद जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोग्राम अंतर्गत तालुक्यातील गावे लखपती करण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि तहसीलदार माया माने यांनी संबंधित गावातील पदाधिकारी, अधिकारी तसेच शेतकरी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. मृद व जलसंधारणाची कामे रोहयोच्या माध्यमातून करून शेतीसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. जेणेकरून संरक्षित सिंचनामुळे शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो व त्यामुळे त्याचे वार्षिक उत्पन्न वाढून तो लखपती होऊ शकतो. यामध्ये शेतकऱ्यांना पारंपरिक पिके घेण्यापेक्षा भाजीपाला वर्गीय पिके तसेच फुल शेती,फळबाग करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे . गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोहयोच्या माध्यमातून सिंचन विहिरी, गोदाम, ग्रामपंचायत भवन, बचत भवन, रस्ते, नाली, शोषखड्डे, जैतादेही पॅटर्न अंतर्गत शाळेच्या अंगणवाडीच्या परिसरातील भौतिक विकासाची कामे, बंधारे इत्यादी कामे रोहयोच्या माध्यमातून करून गावांचाही विकास साधण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
बॉक्स
मग्रारोहयोत शेतकरी केंद्रबिंदू
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे निवडताना त्याचा केंद्रबिंदू हा शेतकरी असावा आणि रोहयोच्या माध्यमातून जलसंधारणाचे जास्तीत जास्त कामे करून शेतकऱ्यांचे उत्पादन अधिकाधिक वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावे यासाठी चिखलदरा तालुक्यातील प्रशासन रोहयोचे सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, प्रकल्पाधिकारी मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि तहसीलदार माया माने त्या दृष्टीने कार्य करत आहेत.