अमरावती - बाल स्वास्थ्य योजनेत वापरण्यात येणा-या वाहनांच्या ई-निविदा प्रकरणात घोळ झाल्याची तक्रार प्रहारचे शहर अध्यक्ष चंदू खेडकर यांनी केली होती. याच बरोबर माहितीच्या अधिकारात या प्रकरणाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाकडून मागविली होती. त्याला १० महिन्यांचा कालावधी लोटूनही माहिती प्राप्त झालेली नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदनातून दिला आहे. बाल स्वास्थ्य योजनेत शालेय आरोग्य तपासणी पथकातील वाहनाबाबत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेमधील वाढीव ३४ वाहनांची माहिती मागविण्यात आली होती. परंतु, १० महिन्यांपासून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. याच आधारे प्रहारचे शहराध्यक्ष चंदू खेडकर यांनी या प्रक्रियेत आर्थिक घोळ झाल्याचा आरोपही केला आहे. वाहन पुरविण्याचे कंत्राट रत्नम टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक रफीउद्दीन वल्द बावोद्दीन (रा. नरदोडा) यांनी घेतले आहे. सदर निविदाधारकाच्या निविदेचा वाढीव आदेश रद्द न केल्यास प्रहारतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वाहनांची मागितली माहिती एमएच २७ बीएफ ०२४९, एमएच ०४ ईएस २३२५, एमएच ३२ बी ८१३, एमएच १४ एव्ही ५३०८, एमएच ०४ ईएस १२८६, एमएच ३० एए ५३१६, एमएच ०४ ईएस ८४८२, एमएच ०४ बीई ९७६१ अशा क्रमांकाच्या आठ वाहनांची टॅक्स पावती, फिटनेस सर्टिफिकेट, ९ आगस्ट २०१७ पर्यंतच्या वैध विम्याची प्रत आदी माहिती तक्रारकर्ते चंदू खेडकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे मागितली आहे.
बाल स्वास्थ्य योजनेची माहिती १० महिन्यांपासून अनुपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 6:32 PM