अमरावती : मिक्सिंग मशीनवर दगड काढण्याचे काम करणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा तेथील जेसीबीच्या धडकेत मृत्यू झाला. ५ जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वडगाव माहोरे रोडवरील एस. एल. खत्री यांच्या काँक्रीट प्लॉटवर तो अपघात घडला. भारत शोभेराम कास्देकर (१५,रा. निमकुंड,पो. स्टे. परतवाडा) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी, अंकुश भुसूम यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी जेसीबी चालक प्रमोद सहारे (४५,माहुली जहांगीर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. भारत कासदेकर हा ५ जुलै रोजी सायंकाळी मिक्सिंग मशीनवर दगड काढण्याचे काम करीत होता. तर अंकुश बाजूच्या गोडाऊनमध्ये सिमेंटचे पोते भरण्याचे काम करीत होतो. तेवढ्यात मिक्सिंग मशीन चालक अतुल खंडारे ओरडल्याने अंकुश व अन्य कामगार मिक्सिंग मशीनजवळ गेले असता भारत हा जेसीबी चालकाजवळ जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूसह पायाला मार असल्याने त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. चालक प्रमोद सहारे याने निष्काळजीपणे जेसीबी चालविल्याने तो त्याच्या अपघातीमृत्यूस कारणीभूत ठरला. याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांनी ६ जुलै रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. भारत हा चार-पाच दिवसांपूर्वीच गावातील काही मजुरांसह वडगाव रोडवरील त्या काँक्रीट प्लांटवर काम करण्यास आला होता.