अमरावती : चाईल्ड लाईन व बाल संरक्षण कक्षाने २६ जून रोजी नियोजित बालविवाह रद्द करण्यास वधुपक्षाला भाग पाडले व मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले. दोन महिन्यांत १५ बालविवाह चाईल्ड लाईन व बाल संरक्षण कक्षाने रोखले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चाईल्ड लाईनला १०९८ या नि:शुल्क क्रमांकावर जिल्ह्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह नागपूर येथील 22 वर्षीय व्यक्तीशी जुळला असून, ५ जून रोजी साखरपुडा झाल्याची माहिती मिळाली. २६ जूनरोजी हा बालविवाह नियोजित होता. ही माहिती चाईल्ड लाईनच्या चमूने जिल्हा महिला बालविकास अधिकारी, जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाला दिली. त्यानंतर तात्काळ चाईल्ड लाईनने बालिकेच्या घरी भेट दिली. तिच्या आई-वडील व नातेवाईकांना बालविवाह
प्रतिबंधक कायदा २००६ ची माहिती दिली. चाईल्ड लाईनने मुलीला व तिच्या नातेवाइकांना बाल कल्याण समितीसमक्ष उपस्थित केले. बाल कल्याण समितीने पालकांकडून बालविवाह थांबविण्याचे हमीपत्र लिहून
घेतले तसेच मुलीला दरमहा बाल कल्याण समितीपुढे उपस्थित करण्यास
सुचविले. सदर प्रकरणात महिला व
बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, बाल कल्याण समिती अध्यक्ष मीना दंडाळे, सदस्य अंजली घुलक्षे, बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, आकाश बरवट, नम्रता कडू, शासकीय बालगृहाच्या समुपदेशक
मनवर, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक अमित कपूर, समुपदेशक सपना गजभिये, पंकज शिनगारे, अजय देशमुख, मिरा राजगुरे, शंकर वाघमारे, सुरेंद्र मेश्राम, सरिता राऊत व चेतन वरठे यांनी सहकार्य केले.