अमरावती : एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या सावत्र आई-वडिलांसह लग्नात मध्यस्थी करणाऱ्या पंडितावर फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हे दाखल केला आहे. तिच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. लग्नानंतर पतीने अत्याचाराचा कळस गाठल्याची तक्रार पीडित मुलीने चाईल्ड लाईनकडे दिली होती. शहरातील रहिवासी पीडित मुलीचे आई-वडील सावत्र असून त्यांनी मध्य प्रदेशातील श्योपूर येथील रहिवासी राकेश गुप्ता (३५) नामक युवकासोबत जबरीने लग्न लावून दिले होते. १९ जानेवारीला मुंबई येथील चाईल्ड लाईनला फोनवर माहिती दिल्यावर हे प्रकरण उघकीस आले. चाईल्ड लाईनकडे दिलेल्या तक्रारीत तिने शोषणमुक्त करण्याची विनंती केली होती. पीडित मुलीच्या बयाणात परतवाडा येथील एका पंडिताच्या माध्यमातून तिच्या आई-वडिलांनी जबरीने लग्न लावून दिल्याचे सांगण्यात आले आले. लग्नाआधी पीडित मुलगी फे्रजरपुरा पोलिसांकडे गेली होती. मात्र, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित नसल्याने पोलिसांनी तिची तक्रार नोंदविली नाही, असा आरोप पीडितेने केला आहे. १२ व १३ नोव्हेंबर २०१४ रोजी तिला जबरीने राज्यस्थान येथील कोटा गावात नेऊन एका बगिच्यात लग्न लावण्यात आले. विवाहानंतरही अत्याचार कमी झाले नाही. पतीनेही तिच्या बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करुन अश्लील फोटो काढले. पती राकेश दारु पिवून दररोज मारहाण करीत होता. राकेश यांच्या नात्यातील एक मुलगा व नणंदेचा नवरासुध्दा मुलीवर नजर ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत होता. असे पीडित मुलीने बयाणात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
बाल विवाह लावून देणाऱ्या आई-वडिलांना अटक
By admin | Published: February 03, 2015 10:47 PM