अमरावती : प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, असे म्हटले जाते. प्रेमात आंधळं होऊन लोक काय नाही करत. येथे चक्क एक अल्पवयीन मुलगा ३० वर्षीय परित्यक्ता महिलेच्या प्रेमात पडला. इतकेच नव्हे तर, त्यांच्या आपसातील भेटीगाठी पाहून जातपंचायतींने त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याची चाहुल लागताच बाल संरक्षण कक्षाने त्याठिकाणी धाव घेत हा विवाह थांबविला.
तळेगाव दशासर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या एका गावात हा प्रकार सोमवारी उघड झाला. गावात नव्यानेच राहायला आलेल्या त्या ३० वर्षीय महिलेने या अल्पवयीन मुलाला आपण विवाहित असून, तीन लहान मुलांची आई असल्याची माहितीसुद्धा दिली. मात्र, आकर्षणाच्या ओघात वाहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आणि वयस्कर महिलेच्या प्रेमाच्या गाठीभेटी सुरु झाल्या. गावात त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या बऱ्याच चर्चा झाल्या. मात्र, या दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा ठामपणे निर्णय घेतला. २७ डिसेंबर रोजी विवाहाचा मुहूर्त ठरला. लग्नाची तयारी सुरू झाली. या घटनेची माहिती बाल संरक्षण कक्ष व पोलिसांना मिळाल्याने हा विवाह थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू झाला.
ग्रामसभेत शिरले अधिकारी
२७ डिसेंबर रोजी त्या गावात ग्रामसभा सुरू होती. विवाहाचा तो प्रकार तेथे सांगण्यात आला. विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच बाल संरक्षण कक्ष, जातपंचायत आणि पोलीस विभागाच्या सहकार्यातून हा विवाह थांबविण्यात आला. एका वयस्कर महिलेचा एका अल्पवयीन मुलासोबत विवाह होणार होता. संबंधित ठिकाणी पोहोचून तेथील कुटुंबियांना ही बाब कायद्याने गुन्हा आहे, हे सांगितले तसेच गावातील ग्रामसभेत अशाप्रकारच्या घटना गावात होता कामा नयेत, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी सांगितले.