पान २ ची सेकंड लिड
फोटो पी १६ देवगाव
परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत नातेवाइकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगावात लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन, चार व १२ वर्षे वयाच्या बालकांचा समावेश आहे. अशा या तीन कोरोना संक्रमित मुलांची नोंद आरोग्य विभागाने घेतली असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे.
केवळ लग्न आणि स्वागत समारंभ यामुळे देवगावात कोरोनाने उग्र रूप धारण केले. २८ एप्रिलपासून १५ मेपर्यंत या गावात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ७५ हून अधिक पोहोचली आहे. देवगावमध्ये कोरोना संक्रमितांची वाढती संख्या बघून धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गावातच कोरोना चाचणी शिबिर ११ मे रोजी घेण्यात आले. यात ८७ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. पैकी २३ लोकांचे कोरोना अहवाल १४ मे रोजी पॉझिटिव्ह आले. दरम्यान, याच दिवशी परतवाडा येथील खासगी प्रयोगशाळेत रॅपिड अँटिजेन टेस्ट करवून घेतलेल्यांपैकी सहा लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यामुळे १४ मे रोजी एकाच दिवशी देवगावात २९ कोरोना संक्रमितांची नोंद झाली.
कोरोना संक्रमित रुग्णांना आरोग्य विभागाकडून औषधी वितरित करण्यात आली, तर वयोवृद्ध आणि अगदी बालवयाच्या कोरोना संक्रमितांना गाव प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे. उर्वरित अन्य बुरुडघाट येथील कोविड सेंटरवर पाठविण्यात आले आहेत.
आज तपासणी शिबिर
देवगाव येथील कोरोना संक्रमितांना हुडकून काढण्याकरिता आरोग्य विभागाकडून गावात परत १७ मे रोजी कोरोना चाचणी शिबिर ठेवण्यात आले आहे. देवगावची लोकसंख्या १ हजार ८५० असून, केवळ ६० वर्षांवरील १५ ते १६ जणांनीच कोरोना लस घेतली आहे. लस उपलब्ध नसल्याने उर्वरित गावकरी कोरोना लसीच्या प्रतीक्षेत आहेत.