अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सावरत नाही तोच बालकांना असलेल्या पोस्ट कोविड आजार ‘एमएसआयसी’ (मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम) चा त्रास वाढल्याची उदाहरणे समोर आली आहे. त्यामुळे पालकांनी या आजाराचे लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना करणे महत्वाचे झाले आहे. जिल्ह्यात मात्र, आरोग्य विभाग अद्यापही ठिम्म असल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपर्यत जिल्ह्यात मे अखेर २,३२६ बालकांना (१० वर्षाआतील) कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. यातून सावरत नाही तोच दोन महिन्यात तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. या तिसऱ्या लाटेत लहान बालके अधिक संक्रमित होतील, असे सांगण्यात येत असल्याने पालकवर्गात काळजी व्यक्त होत आहे. महापालिका क्षेत्रात अद्याप या आजाराचा एकही बालक आढळल्याची नोंद नसल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांनी सांगितले
बालकांना होणारे आजार याविषयीची कार्यशाळा याच आठवड्यात महापालिकेत घेण्यात आली, याला शहरातील बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते. या कार्यशाळेत बालकांचे आजाराविषयी आवश्यक खबरदारी, लक्षणे व उपायोजनांवर चर्चा करण्यात आलेली आहे. शहरातसह जिल्ह्यात ‘एमएमआयसी’ या आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण अद्याप सुरु नसल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
ही घ्या काळजी
* दोन वर्षावरील बालकांव्यतिरीक्त इतर बालकांनी बाहेर जाताना मास्क लावणे महत्वाचे आहे. लहान बालकांना पालकांच्या निरीक्षनात मास्क लावता येणार आहे.
* बालकांना सतत ताप असल्यास किंवा पोटदुखी असल्यास वेळ न गमविता डॉक्टरांना दाखविला पाहिजे, कुठलेही लक्षण असल्यास डॉक्टरांना दाखविले पाहिजे.
* ज्या बालकांना कोरोना झालेला आहे. अश्या बालकांच्या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे, मळमळ होणे, उलट्या करणे, डोळ्याचा रंग लाल होणे याबाबत डॉक्टरांना दाखविले पाहिजे.
कोट
कोरोनातून बरे झालेल्या बालकांना ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ हा आजार होतो. अद्याप अश्या रुग्णांची नोंद आमच्याकडे नाही. बालकांना कोरोना होऊच नये, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ विशाल काळे,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
बॉक्स
कोरोनाचे एकूण रुग्ण : ९५,७२६
कोरोनावर मात केलेले : ९३,५३७
जिल्ह्यात एकूण मृत्यू : १५४६
उपचार घेत असलेले रुग्ण : ६४३