पाच वाहने जप्त : लहानग्यांच्या टोळीचा सूत्रधार नागपुरातअमरावती : आलिशान आयुष्य जगण्याची चटक, मोबाईल, महागड्या गाड्या आणि इतर अद्ययावत सुखसोयींसाठी लागणारा पैसा अपुरा पडत असल्याने तो मिळविण्याकरिता श्रीमंत कुटुंबातील अल्पवयीन मुलांनी चक्क दुचाकी चोरीचे सत्र घडवून आणले. सहा महिन्यांपासून शहरातून बेपत्ता होणाऱ्या दुचाकी या अल्पवयीनांच्या टोळीने लंपास केल्याची धक्कादायक बाब सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. शहर कोतवाली पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. या टोळीत १० पेक्षा अधिक सदस्य असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. उल्लेखनीय म्हणजे ताब्यात घेतलेली ही अल्पवयीन मुले अंबापेठ येथील एका नामांकित शाळेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थी आहेत. नागपूरमध्ये वाहनांची विल्हेवाटअमरावती : पोलीस सूत्रानुसार आसीर कॉलनी येथील मोहम्मद रफीक ऊर्फ राजा (३०) यांची दुचाकी ९ जानेवारीला मालवीय चौकाजवळून लंपास करण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मोहम्मद रफीक हे शेगाव नाका परिसरातील एका दुकानाजवळ उभे असताना त्या ठिकाणी दुचाकीस्वाराचा अपघात झाला. तेथे गर्दीही झाली. नेमकी गर्दी कशाची हे पाहण्यासाठी मोहम्मद रफीक यांनी डोकावून पाहिले असता त्यांना धक्काच बसला. ज्या दुचाकीवरून दोन अल्पवयीन विद्यार्थी कोसळले. ती दुचाकी आपलीच असल्याचे रफीक यांच्या लक्षात आले. लगेच रफिक यांनी याबाबत तत्काळ गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. ही बाब शहर कोतवालीच्याही लक्षात आणून दिली. रफीक यांनी त्या दोन अल्पवयीन मुलांना थांबवून ठेवले. ५.३० च्या सुमारास शहर कोतवालीचे डिबी पथक शेगाव नाका परिसरात पोहचले. पोलिसांनी दोन दुचाकींसह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन शहर कोतवाली ठाण्यात नेले. पोलीसी खाक्या दाखविताच ते विद्यार्थी पोपटासारखे बोलू लागले आणि दुचाकी चोरीच्या सत्राचे रहस्य उलगडले. ताब्यात घेतलेल्या तिघांच्या माहितीवरून आणखी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. उशिरा रात्रीपर्यंत त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्यात. चोरलेल्या दुचाकींची विल्हेवाट नागपूरमध्ये करीत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. अल्पवयीनांची ही टोळी बिनधास्तपणे वाहनचोरी करीत होती. त्यांचा आणखी किती गुन्ह्यांत सहभाग आहे, या दिशेने तपास सुरू आहे.सुगनचंद गुप्ता पोहोचले डिबी रूममध्ये ताब्यात घेण्यात आलेले पाचही अल्पवयीन आरोपी शहराच्या विशिष्ट भागातील आणि विशिष्ट आडनावाची असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. त्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याचे कळताच त्यांच्या पालकांनी शहर कोतवाली ठाण्यात एकच गर्दी केली. स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक सुगनचंद गुप्ता हे देखील ठाण्यातील डीबी रुममध्ये पोहचले. शिक्षणाच्या वयात चोरीच्या मार्गाला लागणाऱ्या मुलांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीसाठी की चोरी करणाऱ्या मुलांना सोडण्याचा आग्रह धरण्यासाठी, यापैकी गुप्ता नेमके कशासाठी आले होते, याची चर्चा नागरिकांत होती. आपल्या हद्दीतील चोरीला गेलेल्या दुचाकीशी या अल्पवयीन मुलांचा संबध आहे का हे पाहण्यासाठी अन्य पोलीस ठाण्यातील कर्मचारी व गुन्हे शाखेचे पथकही शहर कोतवाली ठाण्यात पोहचले होते.चोरीची अफलातून पध्दत दहावीच्या अ आणि ब या दोन तुकडीचे विद्यार्थी असलेल्या या अल्पवयीन मुलांची दुचाकी चोरीची पध्दती भन्नाट असल्याचे तपास अधिकारी एपीआय सुमित परतेकी यांनी सांगितले. बनावट चाबीने दुचाकी चोरायची, पंचशील टॉकीजजवळ असलेल्या एका व्यावसायिक संकुलाच्या वाहनतळात नेऊन ठेवायची. दोन दिवसांनी पार्किंगमधून ती दुचाकी काढायची. दोन चार दिवस फिरवायची आणि नागपूर येथील सदस्याला पुढील विल्हेवाटीसाठी देऊन द्यायची. आपला वाटा आधिच घ्यायचा, अशी ती पध्दती. चोरीची दुचाकी फिरवितानाच हे बालचोर तक्रारकर्त्याच्या दृष्टीस पडले नि बिंग फुटले.‘लोकमत’चा पाठपुरावा१५ दिवसांमध्ये ३२ पेक्षा अधिक दुचाकी शहरातून चोरीला गेल्यात. लोकमतने हा मुद्दा लाऊन धरला. दुचाकी चोरांची पाळेमुळे खणून काढण्याची ग्वाही नवनियुक्त पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिली होती. दुचाकी चोरांची मोठी टोळी हाती लागल्याने नव्या सीपींच्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. राजापेठ पोलिसांनीही पकडली वाहनचोरांची टोळीअमरावती : राजापेठ पोलिसांनी रविवारी रात्री गस्तीदरम्यान वाहन चोरांची टोळी जेरबंद केली. यामध्ये बुधवारा परिसरातील तीन अल्पवयीनांचा समावेश असून पोलिसांनी शुभम् बद्रे (२०) या आरोपीला अटक केली. अल्पवयीन आरोपींना पालकांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी आरोपीजवळून दोन दुचाकी, कार व चाकू जप्त केला आहे. पोलीस सुत्रानुसार, राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस.भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी व कर्मचारी रविवारी शहरात गस्त घालत असताना त्यांना काही युवक दुचाकीने व कारमधून स्टंटबाजी करताना आढळून आले. दुचाकीसह कार व चाकू जप्तअमरावती : पोलिसांनी दुचाकीस्वार व कार थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कारची तपासणी केली. कारमध्ये चोरीत उपयोगी पडणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते साहित्य जप्त करून चारही जणांना ताब्यात घेतले. चौकशी सरू असून चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. वाहनाचा रंग बदलविण्यासाठी स्प्रे रंगआरोपीजवळून जप्त केलेल्या साहित्यामध्ये स्पे्र रंगांच्या बाटल्या पोलिसांनी आढळून आल्या.चोरलेल्या वाहनांची ओळख रोखण्यासाठी वाहनाचा क्रमांक अथवा रंग बदलविण्यासाठी स्पे्र रंगाचा वापर केला जातो. आरटीओ अधिकाऱ्याच्या घरी पाच लाखांची चोरीआरोपींपैकी एका चोराने आरटीओ अधिकाऱ्यांकडे पाच लाखांची चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. मात्र, या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली नव्हती. या पैशातून चोरांनी तीन महागड्या दुचाकी व एक कार खरेदी केली होती. जप्त केलेल्या दुचाकी चोरीच्या आहेत का? याचा शोध पोलिसांनी चालवला आहे.शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले हे खरे आहे. मात्र गुन्हेगारी उघडकीस येण्याचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलीस आयुक्तांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल. - रणजित पाटील, गृहराज्यमंत्री, शहर विभागचोरी करणारे अल्पवयीन आहेत. पाच जणांना आम्ही ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्यात. अल्पवयीन असल्याने मुलांना पालकांच्या स्वाधिन केले. मंगळवारी बाल न्यायालयात हजर करू.- ज्ञानेश्वर कडू, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोतवाली
श्रीमंतांची अल्पवयीन मुलेच निघाली दुचाकी चोर
By admin | Published: January 19, 2016 12:05 AM