अमरावती : छत्रपती संभाजी महाराज पराक्रमीच नव्हे, तर बहुभाषिक प्रज्ञावंत साहित्यिक होते. पराक्रम आणि पांडित्य, प्रतिभा यांचा अनोखा मेळ छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष सतीश तराळ यांनी रविवारी केले. येथील विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पहिल्या वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
मराठीची आद्यकविता ‘महदंबेचे ढवळे’ व आद्य गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ विदर्भात लिहिले गेले व त्यांच्या निर्मितीत वऱ्हाडी बोलीचा वाटा महत्त्वाचा आहे. वऱ्हाडी वाङ्मय म्हणजे केवळ वऱ्हाडी बोलीचे वाङ्मय नव्हे, तर येथील जाणिवेचे, जीवनाचे साहित्य होय. वऱ्हाडी साहित्य समन्वयमहर्षी गुलाबराव महाराज यांनी प्रचंड ग्रथनिर्मितीच केली नाही, तर साहित्यशास्त्रीय विचार मांडून साहित्यशास्त्र निर्मितीतही योगदान दिले. वऱ्हाडी बोलीत बालसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे. बालसाहित्यच राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी कार्य करीत असते. याशिवाय वऱ्हाडी वाङ्मय, कथा, कविता, कादंबरीच्या पुढे जाऊन त्यात चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, नाटके, ललितनिबंध यांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जनसाहित्याचे प्रवर्तक सुभाष सावरकर, ज्येष्ठ कथाकार सुरेश आकोटकर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर आदींनी यावेळी विचार मांडले. त्यापूर्वी बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथनात, नरेंद्र माहुरतळे, विनय मिरासे, विनोद तिरमारे, अनघा सोनखासकर, संघमित्रा खंडारे, अ.भा. ठाकूर यांनी कथाकथन केले. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात अजय खडसे, राजेश महल्ले, कविता डवरे, ममता मस्के आदींनी कविता सादर केल्यात. यावेळी मिर्झा रफी अहमद बेग यांनीही रसिकांना मंत्रमुग्ध केले. विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली नवोदितांचे कविसंमेलन झाले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन वऱ्हाडी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष का.रा. चव्हाण यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. सभागृहात शेकडो रसिकांनी हजेरी लावली होती.