नरेंद्र जावरे
परतवाडा (चिखलदरा) : चिखलदरा तालुक्यातील धरमडोह येथील सरिता किशोर कास्देकर या महिलेचा चिमुकला दगावला. आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका आणि मदत न दिल्यामुळे अमरावतीपर्यंत मृतदेह एसटीतून आणावा लागला. त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असून, संबंधित डॉक्टरसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ निलंबन आणि हकालपट्टीची कारवाई न झाल्यास विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी एका पत्राद्वारे आरोग्यमंत्र्यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मेळघाटातील रुग्णवाहिका बीअर बार आणि ढाब्यावर थांबत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा दौरा झाला. मात्र, आरोग्य यंत्रणा आदिवासींच्या जिवावर उठल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले.
चिखलदरा तालुक्यातील धरमडोह या गावामधील सरिता किशोर कास्देकर या महिलेची प्रसूती टॅम्ब्रुसोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झाली. बाळाची प्रकृती बिघडल्यावर उपचाराकरिता बाळाला टॅम्ब्रुसोडा येथून अचलपूर, अचलपूरवरून अमरावती व अमरावती येथून नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले.
रुग्णवाहिका मिळाली नाही; अखेर पित्याने बसमधूनच नेला चिमुकल्याचा मृतदेह
नागपूर येथे रुग्णालयात १८ दिवस उपचारानंतर बालकाचा मृत्यू झाला. नियमानुसार मृतदेह त्याच्या पालकांसह शासकीय रुग्णवाहिकेने त्यांच्या घरी गावामध्ये पोहोचविणे आवश्यक होते. तथापि, टेम्ब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पिंपरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्याशी मृताच्या नातेवाइकांनी वारंवार संपर्क करूनसुद्धा त्यांनी मृतदेह नेण्याकरिता कोणताही प्रतिसाद दिला नाही.
मेळघाटातील मरणयातना संपणार तरी केव्हा? आरोग्य प्रशासनाचे वाभाडे चव्हाट्यावर
वर्गणीची भीक आणि पुढचा प्रवास
आदिवासींना रुग्णवाहिकासुद्धा उपलब्ध करून दिली नाही. ज्यामुळे मृत बालकाच्या आई-वडिलांकडे प्रवासासाठी पैसे नसल्याने त्यांनी नागपूर जीएमसी येथे वर्गणी गोळा करून कापडामध्ये मृतदेह गुंडाळून तो एस.टी. महामंडळाच्या बसमधून नागपूर ते अमरावतीपर्यंत आणला. आदिवासींसाठी कोट्यवधीच्या योजना असताना मृतदेह घरापर्यंत पोहोचवून देण्यासाठी रुग्णवाहिका न देणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे.
डॉ. पिंपरकर, डॉ. रणमले यांची हकालपट्टी करा
मृतदेहाच्या विटंबनेस जबाबदार असणाऱ्या डॉ. चंदन पिंपरकर, डॉ. दिलीप रणमळे यांचे ताबडतोब निलंबन करून त्यांची अमरावती जिल्ह्याबाहेर बदली करावी. अन्यथा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्यावेळी न्याय मिळावा म्हणून मला विधान भवनाच्या पायऱ्यांवर नाइलाजाने बसून आंदोलन करावे लागेल, असा इशारा पत्राद्वारे आरोग्यमंत्र्यांसह यंत्रणेला दिला आहे.
कुणीच नाही केली विचारपूस
गरिबाचा कोण वाली. टेम्ब्रुसोंडा येथून अमरावती व लगेच दुसऱ्या वाहनात बसून नागपूरला पाठविण्यात आले. येथील डॉक्टरांनी १५ दिवस कुठलीच विचारपूस केली नाही, असा गंभीर आरोप महिलेने ‘लोकमत’शी बोलताना केला. बाळाच्या निधनाचे दुःख आणि तिचे अश्रू संताप व्यक्त करणारे होते, यासंदर्भात महिलेसह तिचा पती यांनी माजी सभापती बन्सी जामकर, पेंटर रामजी सावलकर, प्रकाश जामकर, दादा खडके, रामबाबू यांच्याकडे घटनेची लेखी तक्रारसुद्धा दिली आहे.
संबंधित जबाबदार डॉक्टर व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई न झाल्यास हिवाळी अधिवेशनात पायरीवर बसून आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे. धाब्यावर ॲम्बुलन्स पाठविणारे आदिवासींच्या दुःखात रुग्णवाहिका उपलब्ध करून देत नसल्याचा प्रकार संतापजनकच आहे.
- राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट