तीन भावंडं गंभीर : धारणीतील धरणमहू गावातील घटना अमरावती : शिळी खिचडी खाल्ल्याने धारणीतील धरणमहू गावात एका बालकाचा मृत्यू झाला. त्याचे तीन भावंड गंभीर झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. योगेश रामविलास भिलावेकर (८) असे मृताचे, तर सुशील भिलावेकर (७), मनीषा भिलावेकर (१२) व सावित्री भिलावेकर (१०) अशी गंभीर भावंडांची नावे आहेत. धारणी तालुक्यातील धरणमहू येथील भिलावेकर कुटुंबीयांनी ६ मे रोजी रात्री खिचडीचा आहार घेतला. दुसऱ्या दिवशी वरिष्ठ मंडळी बाहेरगावी गेले असता ती खिचडी घरातील चार भावंडांच्या खाण्यात आली. त्यामध्ये योगेश रामविलास भिलावेकर, सुशील भिलावेकर, मनीषा भिलावेकर व सावित्री भिलावेकर यांचा समावेश होता. ही बाब घरातील वरिष्ठ मंडळीच्या लक्षात येताच त्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने योगेश व सुशील या दोघांनाही तत्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही अमरावती येथे आणले. मात्र, प्रवासातच योगेशचा मृत्यू झाला. त्यामुळे योगेशला तेथूनच परत धारमहू नेण्यात आले तर सुशीलला इर्विनला हलविण्यात आले. त्यानंतर मनीषा व सावित्री या दोन्ही मुलींना इर्विनला हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मृतदेह शव विच्छेदनाकरिता न पाठविताच नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याने कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त होत आहे.
शिळी खिचडी खाल्ल्याने बालकाचा मृत्यू
By admin | Published: May 09, 2016 12:04 AM