अमरावती : दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायतीमध्ये सात वर्षांपासून रोजंदारीवर काम करीत असताना कायम केले नसल्याने कर्मचाऱ्याने उपोषणाचे हत्यार उगारले. मुलाचे उपोषणाकडे ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनात येताच संतप्त झालेल्या आईने ग्रामपंचायत कार्यालयासच कुलूप ठोकण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
येवदा ग्रामपंचायतीमधील रोजंदारी कर्मचारी कुलदीप प्रल्हाद भालतडक याला सेवेत कायम करण्यासाठी २६ जानेवारी २०१५ रोजी ग्रापंने ठराव घेतला होता. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी केली नाही. याविषयी कुलदीपद्वारा सातत्याने विचारणा करण्यात आली असता ग्रा.पं. प्रशासनाद्वारा वेळकाढू धोरण अवलंबले. अखेर कुलदीपद्वारा ग्रामपंचायत कार्यलायासमोर उपोषण सुरू करण्यात आले. याकडे प्रशासनाने दोन दिवसांपासून दुर्लक्ष केल्यामुळे कुलदीपची आई संतप्त झाली व त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले. त्यामूळे एकच गोंधळ उडाला.
आम्ही कागदपत्रांची पूर्तता करून पंचायत समितीला अहवाल सादर केला, त्यांनीसुद्धा सीईओंकडे पाठविला आहे. जोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पद भरतीची मान्यता मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही.
निरंजन गायगोले, ग्रामविकास अधिकारी