परतवाडा : मेळघाटातील जामली (आर) या गावातील सहा महिने वयाची रिया नारायण कासदेकर ही चिमुकली मागील कित्येक दिवसांपासून गालावरील कानाखालील गाठीने त्रस्त आहे.
रियाच्या गालावर जन्मतः गाठ नव्हती. दीड-दोन महिन्यानंतर ती गाठ दिसून आली. दिवसेंदिवस ती वाढत आहे. गाठ दिसून आल्यानंतर तिच्या पालकांनी गावातील डॉक्टरसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडे तिला दाखविले. पुढे जिल्हा सामान्य रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सावंगी मेघे येथील दवाखान्यामध्ये रियाला तिच्या पालकांनी दाखविले. मात्र, त्या गाठीच्या शस्त्रक्रियेचा खर्च २५ हजार रुपये असल्याचे सांगितले गेले. एवढी रक्कम जुळविण्यास अक्षम असलेले पालक दवाखान्यातून गावी आले.
गरिबी आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे औषधोपचाराविना परतलेल्या असताना अलीकडे रियाला त्या गाठीच्या त्रास व्हायला लागला आहे. तिची अवस्था बघून गावकरी आणि गावातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका व समाजसेवक सर्वच अस्वस्थ झाले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी सावंगी मेघेच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाला ६ जुलैला पत्र दिले. यात उपचार व शस्त्रक्रियेवरील खर्च, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट करण्यास सुचविले. या योजनेत समाविष्ट न झाल्यास शस्त्रक्रियेचे देयक जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावे पाठवावे, असे त्या पत्रात नमूद केले. पण, त्याचा फायदा होऊ शकला नाही.
दरम्यान, खोज संस्थेचे बंड्या साने व सामाजिक कार्यकर्ता सुनील कासदेकरसह धर्मेंद्र शेरेकर व अनिल राजने यांनी समाज माध्यमांवर या चिमुकलीच्या गाठीच्या शस्त्रक्रियेकरिता आर्थिक मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.