अमरावती : चायना चाकूची अवघ्या ५०० रुपयांमध्ये ‘होम डिलिव्हरी’ करणाऱ्या एकाला शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेले तब्बल २३ चायना चाकू जप्त करण्यात आले आहेत. ३ सप्टेंबर रोजी नागपुरी गेट हद्दीत ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे खटका दाबला की जीव गेला, अशी गॅरंटी देणारे हे चायना चाकू ई-कॉमर्स वेबसाईटवरही विनासायास उपलब्ध आहेत.
सय्यद आमिन सय्यद सादिक (२३, पठाणपुरा) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला नागपुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाकीर कॉलनीजवळील महापालिकेच्या उद्यानाजवळून एक तरुण चायना चाकूची मोठी डिलिव्हरी घेऊन निघाल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला शनिवारी रात्रीच्या सुमारास मनपा उद्यानाजवळ गाठले. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्या खिशात ९ इंच लांबीचा चाकू आढळून आला. पायदळ जात असलेल्या सय्यद आमिनकडील बॅगची तपासणी केली असता, त्यात आणखी २२ चायना फोल्डिंग चाकू आढळून आले. त्याला त्वरित अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे व टीम क्राईमने ही कारवाई केली.
होम डिलिव्हरी की वैयक्तिक ?
५०० रुपयांमध्ये एक अशी आपण त्या चायना चाकूची विक्री करत असल्याची कबुली त्याने दिली. ते विक्रीसाठीच घेऊन जात असल्याचेही तो म्हणाला. आपण ते चायना चाकू मुंबईतून बोलावले, मात्र ते चाकू तो येथे कुणाला देणार होता, याबाबत मात्र त्याने चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे ऑनलाईनरीत्या मागवून मग येथे चढ्या दराने विकायचे की कसे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.
९० टक्के घटनांमध्ये चायना चाकू
शहरात घडलेल्या खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये चायना चाकूचा वापर झाल्याचे दिसून आले आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ते ५०० ते ७०० रुपयांमध्ये विविध आकारात उपलब्ध आहेत. त्यावर कुणाचाही धरबंद राहिलेला नाही. शहर गुन्हे शाखेने शनिवारी एका तरुणाकडून जप्त केलेल्या चायनिज चाकूच्या ‘जकिऱ्या’मुळे ते येतात तरी कुठून, हे शोधण्यासह त्याच्या खरेदी-विक्रीची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे.
पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहितीवरून सय्यद आमिन याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेले २३ चायना चाकू जप्त करण्यात आले. ते चाकू त्याने मुंबईहून आणल्याचे सांगितले.
नरेशकुमार मुंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा