न्यायमूर्ती थूल : मतभेद सामोपचाराने मिटवावेतअमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामस्थांनी आपसातील मतभेद सामोपचाराने मिटवावेत, असे प्रतिपादन अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी.एल. थूल यांनी केले.चिंचोली या गावातील जातीयवाद आणि बहिष्काराच्या अहवालाबाबत न्यायमूर्ती थूल यांनी आज गावात जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस अधीक्षक लखमी गौतम, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त फिसके, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार नदाफ, सरपंच नंदकुमार वासनकर, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती थूल यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष चर्चा केली. वस्तुस्थिती समजून घेतली. सरपंच, ग्रामस्थ व दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. शासकीय जागेवर गावातील हनुमान मंदिर आणि समाज मंदिर आहे. या जागेवरील अतिक्रमण आणि बहिष्काराबाबत काही दिवसांपासून वाद निर्माण झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गावात सुमारे १५०० लोकसंख्या असून अनुसूचित जाती जमातीची सुमारे १०० आहेत. पिण्याचे पाणी, दुकानातून अन्नधान्य वितरणाबाबत बहिष्कार नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गरजूंना काम मिळावे यासाठी नरेगामार्फत रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच समाजकल्याण विभागाने सामाजिक न्याय विभागाच्या योजनांतून पिठाची स्वतंत्र गिरणी सुरु करण्याबाबत आदेश देण्यात आले. वाद असलेल्या जागेचा प्रश्न मिटविण्यासाठी येत्या २ सप्टेंबर २०१५ रोजी भूमापन अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष मोजणी करुन घेण्याच्या सूचना केल्यात. अतिक्रमण असल्यास ते तातडीने काढून टाकण्यात यावे. या संदर्भात कोणास आक्षेप नोंदवावयाचे असल्यास त्यांनी तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी चांदूरबाजार यांच्याकडे २५ आॅगस्ट २०१५ च्या आत लेखी स्वरुपात आक्षेप नोंदवावेत.
चिंचोली ग्रामस्थांनी आपसात सलोखा ठेवावा
By admin | Published: August 22, 2015 12:35 AM