मोठे बदलीसत्र : प्रशासकीय शिस्तीसाठी आयुक्त सरसावले अमरावती : प्रशासकीय शिस्तीचे भोक्ते असलेल्या महापालिका आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेला शिस्त लावण्याचा संकल्प केला आहे. कार्यालयीन वेळ न पाळणाऱ्या सहायक आयुक्त आणि मुख्य लेखा परीक्षकांसह ११८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारल्यानंतर सोमवारी सहायक आयुक्तांमध्ये खांदेपालट केला जाणार आहे. तद्वतच एकाच खुर्चीला अनेक वर्षापासून चिटकून बसलेल्या कर्मचाऱ्यांचे बदलीसत्र राबविले जाणार आहे. सोमवारी याबाबत आदेश काढले जातील.तब्बल २७ वर्षांपासून लेखा विभागात असलेल्या अविनाश तराळे यांची सामान्य प्रशासन विभागात बदली करून अशा ‘चिपकुं’वर चौफेर लक्ष असल्याचे आयुक्तांनी दाखवून दिले आहे. झोन स्तरावर सहायक आयुक्तांना ज्यादा अधिकार देऊन अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्यानंतर झोननिहाय बदल्यांचे संकेत आयुक्तांनी दिले होते. त्याअनुषंगाने सहायक आयुक्तांच्या बदल्या होतील. यात एका अधिकाऱ्याचा नव्याने समावेश होण्याचे संकेत आहेत. तुर्तास निवेदिता घार्गे, सोनाली यादव, सुनील पकडे, योगेश पिठे आणि मंगेश वाटाणे यांच्याकडे सहायक आयुक्त पदाचा तात्पुरता प्रभार सोपविण्यात आला आहे. यातील सोनाली यादव व निवेदिता घार्गे या मुख्याधिकारी संवर्गाच्या अधिकारी तर योगेश पिठे हे महापालिका आस्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी तर सुनील पकडे व मंगेश वाटाणे हे अधीक्षक दर्जाचे कर्मचारी आहेत. त्याअनुषंगाने पाचपैकी तीन झोनमध्ये बदल अपेक्षित आहेत. अनेकांकडून फिल्डिंगअमरावती : निवेदिता घार्गे यांच्या झोन क्रमांक १ च्या सहायक आयुक्त या जबाबदारीत बदल होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मालमत्ता कराच्या वसुलीत गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेले बडनेरा झोनचे सहायक आयुक्त योगेश पिठे यांच्याकडे शहरातील एका झोनची जबाबदारी दिली जाऊ शकते. महापालिका आयुक्तांनी नव्याने ‘पॉवर डेलिगेशन’ केल्याने अनेकांना सहायक आयुक्तपदाचे स्वप्न पडू लागले आहे. महापालिकेत ‘बॅकडोअर एन्ट्री’ घेतलेल्या एका अधिकाऱ्याने सहायक आयुक्तपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र त्या वादग्रस्त अधिकाऱ्याला अधिकचा पदभार देऊन संकट ओढून घ्यायचे नाही अशा मानसिकतेपर्यंत आयुक्त पोहोचले आहेत. त्यामुळे सोमवारच्या बदली आदेशांकडे वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘चिपकूं’सह सहायक आयुक्तांमध्ये खांदेपालट !
By admin | Published: April 10, 2017 12:19 AM