अमरावती: पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सातत्याने लढा उभारणाऱ्या चित्रा वाघ यांनी यू टर्न घेतला आहे. संजय राठोड प्रकरण आता संपवूया, त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय, प्रश्न आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात माझा लढा सुरू राहील, असे मोठे विधान भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केले.
चित्रा वाघ या अमरावती येथे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रपरिषदेत संजय राठाेड यांच्यासंदर्भात भूमिका मांडली. राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनाही विचारा, असा सवाल चित्रा वाघ यांनी माध्यमांना केला.
वाशिम येथे संदलमध्ये अकबराचे फोटो नाचवण्यात आले. पोलिसांनी कारवाई करावी, असे त्या म्हणाल्या. अफझलखानच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाल्याने त्यांनी शिंदे -फडणवीस सरकारचे अभिनंदन केले. हे अतिक्रमण अवैध होते, ते पाडले गेले तर प्रतापगडावरच नाही तर इतर गडांवरसुद्धा अतिक्रमण आहे, त्यावरसुद्धा कारवाई केली पाहिजे. तसेच वाशिम येथे निघालेल्या संदलमध्ये अकबरांचे फोटो नाचविण्यात आले, अशा प्रवृत्तीला खपवून घेतले जाणार नाही.
या ठिकाणी अद्यापपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली नाही. त्यामुळे तातडीने पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, मी आयजींसोबत यासंदर्भात बोलल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. संभाजी भिडे यांनी टिकली, कुंकू असा महिलांचा अपमान केल्याबाबत चित्रा वाघ यांनी महिलांनी काय बोलावे, काय घालावे, हे त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी या घटनेचे समर्थन करणार नाही, असे त्या म्हणाल्या.