अमरावती : रविनगरातील हनुमान मंदिर परिसरात चवताळलेल्या माकडाने सहा जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी वनविभागाच्या शिकारी प्रतिबंधक पथकाने रेस्क्यू आॅपरेशन चालवून माकडाला पकडल्यावर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रविनगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात मागील सहा दिवसांपासून चवताळलेल्या माकडाने उच्छाद मांडला होता. या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धाव घेऊन त्याने सहा जणांना चावासुध्दा घेतला. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींमध्ये लहान मुले, पुरुष व महिलांचादेखील समावेश आहे. माकडाच्या हैदोसाने भयभीत झालेल्या परिसरातील नागरिकांनी शनिवारी वनविभागाच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर आरएफओ रविंद्र कोंडेवार यांच्या नेतृत्त्वात वनकर्मचारी पी.टी.वानखडे, अमोल गावनेर, फिरोज खान, सतिश उमक, मनोज ठाकूर, अमित शिंदे व चंदू ढवळे यांच्या पथकाने शनिवारी रविनगर परिसर गाठला. दुपारी १२ वाजता वनकर्मचाऱ्यांनी माकडाचा शोध घेणे सुरू केले. तब्बल तासभर माकडाचा मागोवा घेऊन रेस्क्यू आॅपरेशन राबविण्यात आले. वनकर्मचारी अमोल गावनेर यांनी माकडाला बंदुकीच्या सहायाने ट्रँग्यूलाईज करून बेशुध्द केले. तासभर रेस्क्यू आॅपरेशन चालल्याने रविनगर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली होती. माकड जेरबंद झाल्यावर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वनकर्मचाऱ्यांनी माकडाला पिंजऱ्यात बंद करून वडाळी वन कार्यालय परिसरात ठेवले आहे. सहा दिवसांपासून घराबाहेर पडण्यास धास्तावलेल्या नागरिकांची दिनचर्या आता सुरळीत झाली आहे.
चवताळलेल्या माकडाचा सहा जणांना चावा
By admin | Published: November 23, 2015 12:14 AM