नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत येणाऱ्या चुनखडी आरोग्य केन्द्राला टाळे लागले असल्यामुळे उपचाराअभावी एका अतिसारग्रस्त आदिवासीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली, त्यामुळे आरोग्य यंत्रणा किती सतर्क आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा परिसरात आला आहे. १५ दिवसांपूर्वी कोयलारी पाचडोंगरी येथे चौघांचा मृत्यू झाल्यावरही यंत्रणा मृत अवस्थेतच असल्याचे पुढे आले आहे.
शुधम बुडा कास्देकर (वय ४५, रा चुनखडी) असे मृताचे नाव आहे. पोटदुखी, हगवण, उलटी असा त्रास झाल्याने त्याला सोमवारी रात्री चुनखडी येथीलच आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. दवाखान्याला कुलूप होते. एकही कर्मचारी उपस्थित नव्हता, इतकेच नव्हे, तर तेथे मुख्यालयी असणार, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी नुकतीच दिलेली ॲम्ब्युलन्ससुध्दा हजर नव्हती. परिणामी रुग्णाला प्रचंड यातना सहन करत जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मेळघाटात आदिवासींची निव्वळ थट्टा सुरू असल्याचे वास्तव या घटनेने पुन्हा अधोरेखित केले असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
खडीमलवरून आणली ॲम्ब्युलन्स
चुनखडी उपकेंद्राला कुलूप असल्याने सुधम कासदेकर याला वाचविण्यासाठी त्याचा भाऊ पप्पू दुचाकीने मध्यरात्री १ वाजता खडीमल गावात गेला व तेथून रुग्णवाहिका आणली; परंतु तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. आपल्या मोठ्या भावाचा मृत्यू आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी पप्पू बुडा कासदेकर, नंदराम बाबजी भुसुम, शालीकराम कालू कासदेकर यांनी केली आहे.
आरोग्य यंत्रणा नॉट रिचेबल
या संपूर्ण घटनाक्रमानंतर काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राची चमू चुनखडी गावात गेल्याची माहिती आहे. यासंदर्भात संबंधित आरोग्य यंत्रणाच्या डॉक्टरांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
मृतकाची पत्नी चुरणीत भरती
दरम्यान, दूषित पाण्याच्या शिरकावाने मेळघाटात मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण प्रत्येक गावात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवर जिल्हाधिकारी पवनीत कौर, सूचना दिल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी पाठ फिरवताच स्थिती पुन्हा ‘जैसे थे’च झाली आहे. मृतकाची पत्नीसुद्धा अतिसाराने गंभीर आजारी असून तिच्यावर चुरणी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
गंभीर आजारी भावाला गावातील दवाखान्यात नेले. मात्र, कुलूप बंद होते. तेथे रुग्णवाहिकाही नव्हती. दुचाकीने जाऊन खडीमल या गावातून रुग्णवाहिका आणली; परंतु भरपूर वेळ झाला होता. त्यात माझ्या भावाचा मृत्यू झाला. संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
पप्पू कासदेकर, चुनखडी, मृतकाचा भाऊ.