२३ मार्च उघडणार भाग्य, सत्ताधारी, विरोधक एकत्र
वरूड : स्थानिक नगर परिषदेतील नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव सादर झाल्यानंतर १२ मार्चला विशेष सभा घेऊन नगरसेवकांनी पीठासीन अधिकारी असलेल्या नगराध्यक्षांपुढे उपाध्यक्ष मनोज गुल्हाने यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव सादर केला. यावरील ४ विरुद्ध १८ मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित होऊन उपाध्यक्ष पायउतार झाले. आता २३ मार्च रोजी उपाध्यक्षपद कोणाकडे जाणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भाजप १६, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, प्रहार १ आणि वरूड विकास आघाडी १ असे २४ सदस्यीय वरूड नगर परिषदेचे पक्षीय बलाबल आहे. सत्ताधारी नगरसेवकांनीच भाजपच्या नगराध्यक्ष स्वाती आंडे यांना घरचा आहेर दिला. तब्बल ११ नगरसेवकांनी सात विरोधी गटांच्या नगरसेवकांना सोबत घेऊन गतवर्षी अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. चौकशी समितीने अहवाल शासनाकडे पाठविला. आता शासननिर्णयाकडे लक्ष आहे. यामुळे एक वर्षपासून नगर परिषदेतील विकासकामांना खीळ बसली होती. यादरम्यान १२ मार्च रोजी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करून उपाध्यक्ष मनोज गुल्हाने यांच्याविरुद्ध पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष स्वाती आंडे यांच्याकडे अविश्वास ठराव मांडण्यात आला. नगराध्यक्षांच्या परवानगीने मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी मतदान घेतले.
-----------
हात उंचावून मतदान
विद्यमान उपाध्यक्ष मनोज गुल्हाने यांचे बाजूने चार, तर विरोधात १८ नगरसेवकांनी हात उंचावून अविश्वास ठराव मंजूर झाला. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने या रिक्त उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-----
हे आहेत इच्छुक
उपाध्यक्षपदाकरिता गटनेता नरेंद्र बेलसरे, देवेंद्र बोडखे, छाया दुर्गे यांची नावे चर्चेत असली तरी आणखी इतरही नगरसेवक फिल्डिंगमध्ये लागले आहेत. नगराध्यक्ष स्वाती आंडे यांच्यासोबत चार नगरसेवक असून, सत्ताधारी गटाचे ११ आणि सात विरोधी नगरसेवकांच्या एकत्रीकरणामुळे उपाध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. सत्ताधारी गटाची चार मते निर्णायक ठरणार आहेत.
-----------------
नगरसेवकांमध्ये धुसफूस
ऑगस्ट २०२० मध्ये सुरुवातीला नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आला. परंतु, तो शासनदरबारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. भाजपाच्या नेत्यांनी एक-एक वर्ष उपाध्यक्षपद वाटून घेतले. त्यानुसार किशोर भगत, हरीश कानुंगो व आता मनोज गुल्हाने यांना संधी मिळाली. मात्र, गुल्हााने यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने नगरसेवकांमध्ये धुसफूस वाढली व अविश्वास प्रस्तावात त्याचा परिणाम झाला.