बैठक : सुनील देशमुख यांची माहिती अमरावती : चिखलदरा पर्यटनवृध्दीसाठी ‘सिडको’ प्रशासनाची भूमिका सकारात्मक असून सिडकोच्यावतीने चिखलदरा येथे पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख आमदार सुनील देशमुख यांनी दिली.आ.सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक उपक्रम समितीच्या संचालक मंडळाची बैठक नवी मुंबई येथील सिडकोच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीला समिती सदस्य आमदार अनिल परब, आ. बळीराम शिरसकर, आ. हनुमंत डोळस, आ.पाचर्णे, सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटियासह व्यवस्थापकीय संचालक व्ही.राधा, मंदा म्हात्रे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत चिखलदरा पर्यटन विकासासाठीच्या सात मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यासर्व बाबींना बैठकीत मान्यता देण्यात आली. चिखलदरा येथे चांगला प्रशासकीय अधिकारी, कार्यक्षम ‘स्टाफिंग पॅटर्न’ नेमावा, सिडकोच्या भूसंपादनासाठी अधिकारी आणि अभियंत्याची नेमणूक, अमरावती किंवा परतवाडा येथून या प्रकल्पाचे कामकाज चालवावे, सिडकोने यासर्व बाबींसाठी निधीची व्यवस्था करावी, सिडकोचे अस्तित्व दिसण्यासाठी पर्यटनाचे काही पॉर्इंट विकसित करण्यात यावेत. तसेच परिसर सुशोभिकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. यांसह पूर्णवेळ सिडकोचा अधिकारी नेमण्यावर सिडको प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. चिखलदऱ्याचा विकास झाल्यास पर्यटनासह रोजगार वाढीस लागेल, असे मत देखील आ. सुनील देशमुख यांनी वर्तविले. समितीच्या दौऱ्यानंतर चिखलदऱ्याच्या विकासाचे मॉडेल ठरविण्यात आले असून सिडकोच्या माध्यमातून ते पूर्ण केले जाईल, असे आ. सुनील देशमुख म्हणाले.
चिखलदऱ्यासाठी ‘सिडको’ सकारात्मक
By admin | Published: March 05, 2016 12:16 AM