पान १
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपीची आत्महत्या व पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्मघाताने एकीकडे शहर पोलीस दल हादरले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलातील काही पोलिसांची वर्तमान अवस्था ‘बयाण अन् चौकशीचा घेरा, पाठीमागे सीआयडीचा ससेमिरा!’ अशी झाली आहे. राजापेठच्या कोठडीतील सागर ठाकरे आत्महत्या प्रकरणाचा तपास अगदी पहिल्याच दिवशी सीआयडीकडे गेला, तर पीएसआयमुळे आत्महत्या प्रकरण २१ ऑगस्ट रोजी सीआयडीकडे देण्यात आले. शहर आयुक्तालयातील दोन प्रकरणांचा तपास एकाचवेळी सीआयडीकडे गेल्याने संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना बयाणाला सामोरे जावे लागत आहे. दोन्ही प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज राजापेठ फ्रेजरपुरा व पोलीस आयुक्तालयातून सीआयडीने ताब्यात घेतले. त्यांची न्यायवैद्यक तपासणी केली जाणार आहे. मात्र, त्या फुटेजमुळे पोलीस आयुक्तालयातील सुमारे दीड डझन अधिकारी, कर्मचारी चौकशीच्या टप्प्यात आले आहेत. बयाणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सीआयडी तपासाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. तलवार कोसळावी, मात्र ती मान आपली नसावी, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा आहे.
राजापेठ पोलीस ‘बळीचा बकरा?
सध्या पोलीस खात्यात एक चर्चा भलतीच व्हायरल झाली आहे. ती म्हणजे राजापेठ पोलीस बळीचा बकरा तर नाही बनणार ना? गार्ड वगळता पोलीस कोठडीवर २४ बाय ७ वॉच ठेवण्याची जबाबदारी कुणाची होती? ठाणेदाराची, ड्युटी ऑफिसर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांची की स्टेशन डायरी सांभाळणाऱ्या अंमलदाराची? ही ती चर्चा. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यातील आरोपीला राजापेठच्या पोलीस कोठडीत ठेवले जाते. तेथे तो आत्महत्या करतो, यात दोष पोलिसांचाच. पण राजापेठमधील सरसकट सर्वांनाच शिक्षा होत असेल, तर ते न्यायसंगत होणार नाही, असे उघडपणे बोलले जात आहे.
त्या अधिकाऱ्याला बदलीची घाई
पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा नामोल्लेख आहे. त्यांची बदली प्रस्तावित आहेच. मात्र, या प्रकरणामुळे त्या अधिकाऱ्याला आता बदलीचे वेध लागले आहे. कधी आपली बदली होईल अन् कधी कार्यमुक्त होऊ, अशी घाई त्यांना झाल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.