संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माणसे बदलविण्याची जेवढी ताकद पुस्तकांमध्ये आहे, त्याच ताकदीने सिनेमादेखील माणसांत अंतर्बाह्य बदल घडवून आणतो, असे मत प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्री गौैरी कोंगे हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.कापूस कोंड्याची गोष्ट, रंगा पतंगा, डिस्को सन्या, ताटवा, आईचा गोंधळ, ईरादा पक्का, बाबू बॅन्ड बाजा, तुह्या धर्म कोन्चा?, जाणिवा, ३.५६ किल्लारी, लाठी, लॉस्ट अँड फाऊंड अशा एकापेक्षा एक दर्जेदार मराठी सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या गौरीचे आणखी नऊ मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. एक ते चार बंद, श्रीदेवी फटाका, लेथ जोशी, लाडू घ्या लाडू, रेडू, व्हिडिओ पार्लर, मातंगी, चिवटी, नागरिक अशी या चित्रपटांची नावे आहेत.एका कार्यक्रमानिमित्त गौैरी वणी येथे आली असता, तिने चित्रपट क्षेत्रातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला. मराठीत आशयघन सिनेमांची निर्मिती होते; परंतु अशा सिनेमांना प्रेक्षक मिळत नाहीत. याउलट विनोदी धाटणीतील किंवा आयटम साँग असलेले हिंदी चित्रपट करोडोचा व्यवसाय करतात. मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही. उत्तम मराठी सिनेमा सर्वत्र प्रदर्शित व्हावा, ही आमची तगमग असते. परंतु मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा लागला तर त्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. या आणि अशा अनेक कारणांनी मराठीतील सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच तो कुठल्यातरी चॅनलवरून दाखविला जातो. त्यामुळेदेखील प्रेक्षक थिएटरपर्यंत जात नाहीत. पुणे येथे राहणाऱ्या गौरीच्या घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. शाळा, कॉलेजातील स्नेहसंमेलनांमधील नाटकात काम करता करता पुढे व्यावसायिक नाटकं व त्यानंतर थेट मराठी सिनेमात एन्ट्री असा तिचा सारा रूपेरी प्रवासच थक्क करणारा आहे.
सिनेमाही माणसांना अंतर्बाह्य बदलवितो; गौरी कोंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:03 AM
माणसे बदलविण्याची जेवढी ताकद पुस्तकांमध्ये आहे, त्याच ताकदीने सिनेमादेखील माणसांत अंतर्बाह्य बदल घडवून आणतो, असे मत प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्री गौैरी कोंगे हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
ठळक मुद्देमल्टिप्लेक्सचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर