अमरावती : एखाद्या सिनेमाच्या पटकथेला साजेसा असा प्रसंग सोमवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील रायपूर परिक्षेत्रात घडला. यात वन्यजीव शिकार प्रकरणातील चार आरोपी शेतातील एका झोपडीतून बाहेर पडून पळताना वन्यजीव अधिकाऱ्यांना दिसले. वन्यजीव अधिकाऱ्यांकडून त्यांचा अगदी सिनेस्टाइल पाठलाग केला गेला.
जंगलातून आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा गावातील महिला व पुरुष एकत्र आले. ताब्यात घेतलेल्यांना सोडण्याची मागणी त्यांनी पुढे रेटली. वन कर्मचाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. एका वनरक्षकावर आपला ताबा मिळविला. यात वन्यजीव अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि इन केस पंचनामा न करता लागलीच वन्यजीव अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून आपल्या गाड्या अगदी सिनेस्टाइल वळवून परतीच्या मार्गाला टाकल्या.
पाच आरोपींना वन्यजीव विभागाच्या गाडीत बसवून परतीच्या प्रवासाला निघालेली वन अधिकाऱ्यांची गाडी घटनास्थळावरून पुढे सेमाडोह मार्गावर काही अंतरावर पंक्चर झाली. वन्यजीव अधिकाऱ्यांनी कुमक पाठविण्याकरिता चिखलदरा पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे वायरलेस मेसेज पाठविला. चिखलदरा पोलीस घटनास्थळासह रायपूरमध्ये दाखल झाले. यानंतर वन्यजीव अधिकारी आरोपींना घेऊन सिपना वन्यजीव विभागात डेरेदाखल झाले. या प्रकरणात वन्यजीव विभागाला उर्वरित दोन आरोपी हवे आहेत.
मृत वन्यजीवांची संख्या संशयास्पद
रायपूर वनपरिक्षेत्रातील पाणवठ्यावर अनेक वन्यजीव पाणी प्यायल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे चौसिंगा व भेकरासह अन्य वन्यजीव दगावल्याचे वृत्त आहे. मृत्युमुखी पडलेल्या अन्य प्राण्यांचा शोध अजूनही वन्यजीव अधिकाऱ्यांनी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी घेतलेला नाही. याच दरम्यान एक लंगडा बायसन मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. हा बायसन आजारी असल्याचे सांगितले जात आहे.