अमरावती: शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई असून, अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने याची दखल घेतलेली नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर नागरिकांनी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदनातून मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास अधिकाऱ्यांच्या दालनातच घागर फोडो आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला.
शहरातील रवीनगर, वल्लभनगर, पुरुषोत्तमनगर, अंबा विहार, पार्वतीनगर या परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसराला स्वस्तिकनगर तसेच पार्वतीनगर येथील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होतो. मात्र मागील सहा महिन्यांपासून अस्वच्छ तसेच अळ्यायुक्त पाणी येत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने निवेदनातून केला आहे. यासंदर्भात अनेकवेळा अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी स्वरुपात तक्रार करुन देखील याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच मजीप्रा कार्यालयाने पाणी सोडण्याचे वेळापत्रक देखील बदलविले आहे.
या सर्व अनागोंदी कारभाराला या परिसरातील महिला प्रचंड त्रस्त झालेल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत बादलीभर देखील पाणी मिळत नाही. त्यातही एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता पाणीटंचाई संदर्भात तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा युवा सेना व शिवसेना महिला आघाडी मजीप्रा अधिकाऱ्यांच्या कक्षात घागर फोडो आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रीती बंड, शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने स्थानिक महिला व नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकले होते.