अवघे अडीच हजारांनी घेतली लस : आदिवासींमधील गैरसमज कारणीभूत
श्यामकांत पाण्डेय
धारणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्याला अटकाव घालण्याकरिता लसीकरणही जोरात सुरू आहे. मात्र, मेळघाटसारख्या आदिवासी भागात या लसीकरणाबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे.
शासनाकडून पूर्वी ६० वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत होते. मात्र, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांनी या लसीकरणात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, पाहिजे त्या प्रमाणात लसीकरणासाठी नागरिक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. विशेषत: अल्पसंख्याक समुदाय आणि आदिवासी बांधवांमध्ये या लसीविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. रेखा गजरवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. धनंजय पाटील, डॉ. प्रवीण मोरे, डॉ. किरण सोनी, डॉ. शेख, विस्तार अधिकारी सपकाळ, भारले, ऑपरेटर रूपेश राठोड, आरोग्य सेविका जयश्री राठोड, शीतल निंबोकार, शारदा मावस्कर, राहुल तिवारी हे लसीकरणाच्या कामात पूर्ण वेळ देत आहेत. २ एप्रिलपर्यंत २२५६ नागरिकांनी कोरोना लस घेतली.
-------