लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तुम्ही मोबाइल ॲपच्या मदतीने ऑनलाइन कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आताच सावध व्हा. कारण, कर्ज घेतल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी नाहक त्रास देऊन धमक्या देण्याचे तसेच बदनामी करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. याबाबतच्या तक्रारीदेखील सायबर सेलकडे प्राप्त होऊ लागल्या आहेत. यात प्रामुख्याने चायनीज ॲप डाऊनलोड करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. पैशाची गरज असते तेव्हा आधी फक्त बँक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच कर्ज मिळत असे; पण सध्या मोबाइलच्या माध्यमातून एका क्लिकवर झटपट कर्ज मिळत आहे. तत्काळ कर्ज मिळत असल्याने कर्ज घेणारे त्या ॲपची फारशी माहितीही घेत नाहीत. आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याने या माहितीचा गैरवापर करून आर्थिकदृष्ट्या फसवले जात आहे. मोबाइल ॲपच्या सर्व नोटिफिकेशनला परवानगी दिली जात असल्याने मोबाइलमधील सर्व डेटा आपोआप कॉपी केला जातो.
लोन ॲपवरून फसवणूक झाली तर... लोन ॲपवरून फसवणूक झाली तर तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवावी. सायबर भामटे विविध सीमवरून कॉल करीत असतात. अशा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. असे केल्यास फसवणूक होण्यापासून टाळता येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले आहे.
केवळ पाच गुन्हे दाखल
- अमरावती ग्रामीणमधील सायबर पोलीस ठाण्याने आठ महिन्यात सायबर फ्रॉड व विनयभंगाबाबत एकूण ५४ गुन्हे नोंदविले. - त्यात लोन फ्रॉडशी संबंधित पाच गुन्हे आहेत.
फसवणूक टाळण्यासाठी काय कराल ?
कुठल्याही झटपट लोनच्या आलेल्या लिंकला डाऊनलोड करू नका. सायबर भामट्यांच्या आमिषाला बळी पडू नका. कर्ज फेडल्यानंतरही जादाची रक्कम कुणी मागत असल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका.
एका आरोपीला अटक
आठ महिन्यांत झटपट लोनच्या नावाखाली फसवणूकप्रकरणी पाच गुन्हे नोंदविले गेले. त्यात एका आरोपीला अटक करण्यात आली. सायबर भामटे हे दिल्ली, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल येथील असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अटकेला मर्यादा आल्या आहेत.
क्विक लोनच्या मोहात अडकू नका
सोशल मीडियावर झटपट लोनबाबत लिंक पाठविली जाते. २० ते ५० हजारांपर्यंतचे लोन दिले जाते. मात्र, त्यानंतर ३५ टक्के व्याज लावून पैसे उकळले जातात. कर्ज न फेडल्यास वेगवेगळ्या पद्धतीने धमक्याही दिल्या जातात. मोहाला बळी पडू नका. - बी. डी. पावरा, पोलीस निरीक्षक, सायबर