गोपाल डाहाके।
मोर्शी : तालुक्यातील अंबाडा गावाला कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायतीतर्फे येथील विविध कामांत दिरंगाई होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य प्रीतम माणिकराव खेरडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात विविध मागण्यांकरिता ९ ऑगस्ट क्रांतिदिनी धरणे आंदोलन केले.
अंबाडा येथील अपंग बांधवांना ५ टक्के दिव्यांग निधी ग्रामपंचायत स्तरावर सन २०२०-२१ मध्ये अखर्चित रकमेचा तत्काळ अनुशेष भरून काढून दिव्यांगांना लाभ द्यावा, सन २०२०-२१ करिता शासन निकषांनुसार लाभार्थ्यांची निवड करावी; वाॅर्ड क्रमांक एकच्या सभागृहाचे १४ वित्त आयोगातून नियमानुसार टेंडर प्रक्रिया पूर्ण करून व कार्यारंभ आदेश देऊन तत्काळ काम सुरू करावे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे अंतर्गत मंजूर कामाचे लोकेशनबाबत ग्रामसभेत चर्चा करून बदली प्रस्ताव तत्काळ सादर करावा, घरकुल ‘ड‘ यादीतील लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने शासन निर्णयानुसार व निष्कर्षानुसार उचित कारवाई करावी व गरजू लाभार्थ्यांना यात प्राधान्य द्यावे, ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक त्रुटी व वितरण व्यवस्थेत योग्य ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार यांना देण्यात आले.
मागण्यांची तत्काळ दखल घेऊन येथील गटविकास अधिकारी यांनी अंबाडा येथील ग्रामसेवक धनंजय मोहोड यांना सूचना देऊन त्यांच्याकडून सर्व कामांचे तत्काळ निवारण होईल, असे लेखी लिहून घेतले. येत्या आठ दिवसांत विविध कामांची पूर्तता करण्यात येईल, असे त्यांनी लेखी जबाबात म्हटले आहे.
या आंदोलनात अंबाडा ग्रामपंचायतचे सदस्य प्रीतम खेरडे, प्रवीण चांडक, सागर फाटे, उमेश काकडे, हर्षल भोजने, त्र्यंबक अंबाडकर, मुकेश कानफडे, किरण लोणारे, छोटू भेले, सुभाष आंबेडकर, राजू कोकरे, अनिल चढोकर, वृंदा टेकाम, प्रशांत खोब्रागडे, सुमित माहुरे, अतुल कुडवे, मधुकर वानखडे व ग्रामस्थ उपस्थित होते.