लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोशल मीडियामुळे अफवा व खोट्या बातम्या प्रसृत करण्याचे गैरप्रकार वाढले आहेत. या काळात वस्तुनिष्ठ व अचूक माहिती देण्याची जबाबदारी वृत्तपत्रे व वाहिन्यांनी पार पाडावी, तसेच अफवा व चुकीच्या माहितीला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केले.जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस आयुक्तालय येथील सायबर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयात आयोजित 'फेक न्यूज परिणाम व दक्षता' या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सायबर पोलीस ठाणे निरीक्षक अनिल कुरुळकर, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर वर्गे, जनसंज्ञापन शास्त्राचे अभ्यासक प्रशांत राठोड आदी यावेळी उपस्थित होते. समाजमाध्यमांचा वापर करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कुठलीही निराधार, अवास्तव, अतर्क्य माहिती किंवा संदेश शेअर, फॉरवर्ड करू नये. समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर समाजमाध्यमांद्वारे पसरवू नये. फेक न्यूजमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ शकतो. धुळे जिल्ह्यात तशी घटना घडली आहे. प्रत्येक नागरिकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखून समाजमाध्यमांचा वापर करावा आणि यासंदर्भात पारंपरिक माध्यमांनी लोकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही मंडलिक यांनी केले. सोशल मीडियाचा वापर करताना खासगी माहिती उघड करू नये. विशेषत: बँक खाते क्रमांक, सीव्हीव्ही कोड, पीन कोड, ई मेल पासवर्ड आदींबाबत गोपनीयता ठेवावी, असा सल्ला पीआय कुरळकर यांनी दिली. कार्यशाळेत सहायक संचालक (माहिती) गजानन कोटुरवार, विजय राऊत, योगेश गावंडे यांच्यासह शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
फेक न्यूजच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 10:41 PM
सोशल मीडियामुळे अफवा व खोट्या बातम्या प्रसृत करण्याचे गैरप्रकार वाढले आहेत. या काळात वस्तुनिष्ठ व अचूक माहिती देण्याची जबाबदारी वृत्तपत्रे व वाहिन्यांनी पार पाडावी, तसेच अफवा व चुकीच्या माहितीला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केले.
ठळक मुद्देकार्यशाळा : सीपी दत्तात्रय मंडलिक यांचे आवाहन