अमरावती : शासन, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिक अनेक योजना, समस्यांची सोडवणूक करू शकत नाही. दुर्गम, अतिदुर्गम भागातील सामान्य माणूस कार्यालयाच्या येरझारा मारू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी आता थेट शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपनेेते आमदार प्रवीण पोटे यांनी केले.
जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या समस्या अद्यापही प्रलंबित आहेत. धारणी, चिखलदरा व इतर तालुक्यातील सामान्य जनतेला शासकीय कार्यालयात वेळेवर न पोहचल्यास या योजनांचा लाभ घेणे शक्य होत नाही. याच अनुषंगाने सामान्य जनतेच्या तक्रारी व निवेदनाची दखल घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार प्रवीण पोटे यांनी ‘आमदार आपल्या सेवेत’ या उपक्रमावर भर दिला आहे.
वीज वितरण कंपनी, घरकुल, पी.आर. कार्ड, धान्यपुरवठा विभाग, महसूल, कृषि विभाग, पीक विमा, किसान सन्मान निधी योजना, आदिवासी विभाग योजना यासह शासकीय योजना किंवा त्या संदर्भात अडचणी येत असेल तर निवेदन करावे, असे कळविले आहे. यात मोबाइल क्रमांक, नाव, गाव, तहसील याचा उल्लेख करावा किंवा जनसंपर्क कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आमदार प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केले. खासगी सचिव अमोल काळे व स्वीय सहायक अतुल नाचनकर हे कार्यालयात तक्रारी व निवेदन स्वीकारून जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे समस्या त्वरित सोडविल्या जातील, असे आमदार पोटे म्हणाले.